भाजप खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान:लाडकी बहिणीचे पैसे घेणाऱ्या महिला कॉंग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर फोटो काढा, त्यांची व्यवस्था करतो

भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी वादग्रस्त विधान केले आहे. लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये घेणाऱ्या महिला कॉंग्रेसच्या रॅलीमध्ये दिसल्या तर त्यांचा फोटो काढून घ्या, नाव लिहून घ्या. कारण घ्यायचं आपल्या शासनाचे आणि गायचं त्यांचं असे चालणार नाही. अनेक ताया आहेत, महाराष्ट्रात छाती बडवत आहेत. आम्हाला पैसे नको सुरक्षा पाहिजे म्हणत आहेत. असे विधान कोल्हापूरच्या प्रचार सभेत बोलताना महाडिक यांनी केले आहे. धनंजय महाडिक म्हणाले, काँग्रेसच्या सभेला जर महिला दिसल्या तर जाऊन फोटो काढायचे. फोटो आमच्याकडे द्या, त्यांची व्यवस्था करतो. कोण लय बोलायला लागली किंवा दारात आली तर तिला फॉर्म द्यायचा आणि यावर सही कर म्हणायचे आम्ही पैसे लगेच बंद करतो, असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे. आमच्याकडे काय पैसे लय झालेले नाहीत. आम्ही दुसऱ्या गरीब महिलेला देऊ, पण असा दुगलेपणा इथून पुढे चालणार नाही. त्यामुळे आपण जागृत राहिले पाहिजे, असे धनंजय महाडिक म्हणाले. आमच्या आया बहिणींना भाजप पासूनच धोका
धनंजय महाडिक यांच्या या वादग्रस्त विधानावर कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, लाडकी बहिण योजनेचे 1500 रुपये घेणाऱ्या महिलांवर पाळत ठेवण्याचे भाजपचे आदेश दिलेत. काँग्रेसच्या सभेत ज्या महिला दिसतील त्यांचे फोटो काढण्याचे आदेश भाजप खासदार महाडिक यांनी भर सभेत दिलेत. महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेची किंमत भाजपने लावली फक्त 1500 रुपये? लाडक्या बहिणीबाबत भाजपची खरी नियत आज समोर आली. सत्तेची मस्ती भाजपवाल्यांच्या डोक्यात किती चढली आहे हे महाराष्ट्र बघतोय, आमच्या आया बहिणीना भाजप पासूनच धोका आहे. धनंजय महाडिक यांची मुजोरी
काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सतेज पाटील यांनी फेसबुक पोस्ट करत म्हणाले, भाजप खासदार धनंजय महाडिक यांची मुजोरी महिलांना जाहीर सभेत धमकी दिली. काँग्रेसच्या रॅली, सभेत महिला दिसल्या तर त्यांचे फोटो काढा आणि आमच्याकडे द्या..आम्ही व्यवस्था करतो त्यांची !

  

Share