सत्ताधारी भाजप निवडणूक आयोगाच्या मदतीने सर्वसामान्य जनतेच्या मतांवर डल्ला मारत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी केला. काँग्रेस पक्षाला गळती लागली हा केवळ सत्ताधाऱ्यांचा कांगावा आहे. उलट भाजपच सध्या काँग्रेसयुक्त झाला आहे, असे ते म्हणालेत. पुण्यातील खडकवासला येथील सोरीना रिसॉर्टमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने 2 दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यशाळेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून 300 हून अधिक काँग्रेसचे माजी मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहिले आहेत. या कार्यशाळेत पक्षाच्या नवीन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार असून, पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला प्रशिक्षित केले जात आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “काँग्रेस पक्षाला गळती लागली हा सत्ताधाऱ्यांचा कांगावा आहे. काँग्रेस विचारधारा असणारा पक्ष आहे. सध्या भाजप काँग्रेस युक्त झाली आहे. सध्या निवडणुकीत विरोधकांच्या मतांची चोरी सुरू झाली आहे. विविध विधानसभा निवडणुकांत ही गोष्ट स्पष्ट झाली आहे. भाजप निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतांवर डल्ला मारत आहे.” सपकाळ यांनी यावेळी सत्ताधारी पक्षांमध्ये टोळी युद्ध सुरू झाल्याचाही दावा केला. तसेच भाजप राज्यात दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. “राज्यात भाजप कबुतर जिहाद आणू पाहत आहे. सर्वांना जिवंत राहण्याचा अधिकार आहे. त्यांच्या या अधिकाराचे हनन होता कामा नये. पण सत्ताधारी यामध्ये गोंधळ निर्माण करत आहेत. सत्ताधारी पक्षाने राज्यात दंगा करू पथक स्थापन केले आहे,” असे ते म्हणाले. सपकाळ यांनी यावेळी जातीनिहाय जनगणनेची मागणी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी आरोग्य विभागाच्या बजेटवरही टीका केली. “आरोग्य विभागाचे 66 टक्के बजेट हे फक्त रुग्णवाहिकेवर खर्च केले जात आहे. लाडका ठेकेदार तिथे आणला गेला आणि रुग्णवाहिकेवर खर्च केला गेला. सरकारने नागरिकांना उपचारांसाठी बजेटमध्ये पैसेच ठेवले नाहीत. नागपूरसारख्या ठिकाणीही रुग्णवाहिका न मिळणे ही दुर्दैवी गोष्ट आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.