जालना येथील काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशानंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. हेच महाशय काही वर्षांपूर्वी मला गद्दार म्हणत होते. पण काँग्रेसने त्यांना एवढी वर्षे आमदारकी दिली, आणि आता तेच पक्ष सोडून भाजपमध्ये गेले. मग खऱ्या अर्थाने गद्दारी कोणी केली? असा सवाल खोतकरांनी उपस्थित केला. तसेच, जालन्यातील नगरपालिकेवर चौकशी सुरू झाल्यामुळेच गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा आरोपही खोतकरांनी केला. नगरपालिकेतील भ्रष्टाचार लपवण्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश करून संरक्षण मिळवण्याचा हा डाव आहे, असा दावा खोतकरांनी केला. काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी भाजपचे इतर अनेक नेतेही उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये जाण्याची प्रक्रिया सुरू होती, पण योग्य मुहूर्त मिळत नव्हता, असे गोरंट्याल यांनी सांगितले. आज अखेर चांगला मुहूर्त मिळाला आणि मी भाजपमध्ये प्रवेश केला, असे ते म्हणाले. पक्षप्रवेशानंतर बोलताना गोरंट्याल म्हणाले, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत. माझे मित्र संजय केनेकर गेल्या कित्येक दिवसांपासून आग्रह करत होते की भाजपमध्ये या. त्यांच्या आग्रहाला मान देऊन मी आज पक्षप्रवेश केला आहे. तसेच, गोरंट्याल यांनी जालन्यात भाजपला बळकटी देण्याचे आश्वासन दिले. मी तुम्हाला शब्द देतो, जालन्याचा महापौर भाजपचाच होईल. उरलेल्या काळात मी पूर्ण ताकदीने भाजपची सेवा करेन, असे त्यांनी ठामपणे सांगितले. कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसमधील त्यांच्या अनुभवांबाबत स्पष्टपणे भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, मी काँग्रेसमध्ये असतानाही रावसाहेब दानवे, अतुल सावे हे माझे चांगले मित्र होते. मी नवीन आमदार असताना माझे नाव मंत्रिपदासाठी सुचवायला हवे होते. मात्र, जेव्हा आमदाराचे नाव तिसऱ्या यादीत येते, तेव्हा काहीतरी चुकीचे घडते, हे स्पष्ट होते. फक्त तिकीट देऊन काही होत नाही. ज्या प्रकारची रणनीती काँग्रेसने आखायला हवी होती, ती केली गेली नाही, असे सांगत त्यांनी काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका केली. जे माझ्यासोबत होते, ते आज इथेच आहेत. जे आले नाहीत, त्यांनाही मी शुभेच्छा देतो. कुणाल पाटील, संग्राम जगताप हे माझे चांगले मित्र आहेत. काँग्रेसमध्ये तिकीट वाटपात चूक झाली आणि बंडखोर उमेदवाराला मॅनेज करता आले नाही. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली, असेही स्पष्ट केले. मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे, शिंदेगटात नाही. दानवे, लोणीकर, सावे हे माझे खरे मित्र आहेत आणि यापुढे त्यांच्यासोबत पक्षबांधणीसाठी काम करेन, असे गोरंट्याल यांनी ठामपणे सांगितले.