भाजपकडून शिंदे गटाला आणखी एक धक्का?:विधान परिषद सभापती पदासाठी नावावर शिक्कामोर्तब, भाजपचे राम शिंदे भरणार अर्ज

विधान परिषदेच्या सभापती पदाची 19 डिसेंबर रोजी निवड होणार आहे. विधानपरिषद सभापती पदासाठी भाजप नेते राम शिंदे यांचे नाव चर्चेत आहे. भाजपकडून राम शिंदे बुधवारी सकाळी विधान परिषद सभापती पदासाठी अर्ज दाखल करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे भाजप राम शिंदे यांचे पुनवर्सन करणार असल्याचे दिसून येत आहे. नागपूर येथील विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच विधान परिषदेच्या सभापतीची निवड होणार आहे. विधान परिषद सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिंदे गटाच्या आमदार निलम गोऱ्हे यांची सभापती पदावर संधी मिळेल, असा विश्वास शिंदे गटाच्या नेत्यांना आहे. परंतु, भाजपकडून राम शिंदे यांची विधान परिषद सभापतीपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. राम शिंदे हे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे भाजपकडून शिंदे गटाला आणखी एक धक्का मानला जात आहे. अडीच वर्षांपासून सभापती पद रिक्त
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांना सभापती पद सोडावे लागल्यानंतर गेली दोन ते अडीच वर्षांपासून विधीमंडळाचे वरिष्ठ सभागृह म्हणून ओळख असलेल्या विधान परिषदेचे सभापती पद रिक्त आहे. रामराजे यांची विधान परिषदेवर पुन्हा निवड झाली आहे. मात्र, त्यांना पुन्हा संधी मिळू शकलेले नाही. विधान परिषदेच्या सभापती पदाचे काम सध्या परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे पाहत आहेत. राम शिंदेंचा रोहित पवारांकडून पराभव
भाजप नेते राम शिंदे यांचा विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदारसंघातून निसटता पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पाटील यांनी राम शिंदे यांचा पराभव केला. राम शिंदे यांना भाजपकडून विधान परिषद सभापती पदासाठी संधी दिली जात असल्याचे समजते. त्यामुळे भाजप राम शिंदे यांचे पुनवर्सन करत असल्याचे दिसून येत आहे. राज्याला विरोधी पक्षनेताच नाही
दरम्यान विधानसभा निवडणुकीत महायुतीला 237 जागांवर प्रचंड बहुमत मिळाले आहे. तर महाविकास आघाडीला 49 जागाच जिंकता आल्या. कमी जागा मिळाल्याने महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेता पद मिळणार नाही. विरोधी पक्षनेतेपदासाठी एका पक्षाकडे सभागृहाच्या सदस्यसंख्येच्या 10 टक्के आमदारांची संख्या असणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात विधानसभा सदस्यांची एकूण संख्या 288 आहे. विरोधी पक्षनेता पदासाठी कोणत्याही एका पक्षाकडे किमान 29 आमदारांचे संख्याबळ आवश्यक आहे. मात्र महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या तिघांकडेही पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे विरोधकांना विरोधी पक्षनेतेपदही मिळेल की नाही हे अद्याप अस्पष्ट आहे. त्यात विरोधकांकडून विरोधी पक्षनेता पदाचा कुठलाही प्रस्ताव दाखल झालेला नाही.

  

Share