मी बोगदा, टनलमध्ये 1 नंबर:​​​​​​​बोगदाही होणार आणि शहराची पाणी पुरवठा योजनाही होणार, CM एकनाथ शिंदे यांची कन्नड येथे ग्वाही

मी बोगदा व टनेल बांधण्यात एक नंबर आहे. त्यामुळे बोगदाही होणार आणि शहराची पाणी पुरवठा योजनाही पूर्ण होणार, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी कन्नड येथील आपल्या प्रचारसभेत बोलताना दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सोमवारी कन्नड येथे शिवसेना उमेदवार संजना जाधव यांच्यासाठी प्रचारसभा झाली. यावेळी त्यांनी मतदारांना येथील सर्वच प्रलंबित योजना पूर्ण करण्याची ग्वाही देत या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या पाठिशी उभे राहण्याचे आश्वासन दिले. व्यासपीठावर उमेदवार संजना जाधव यांच्यासह खा.संदीपान भुमरे,माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे,शिवसेना जिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत,भाजपा जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, डॉ संजय गव्हाणे यांची उपस्थिती होती. एकनाथ शिंदे, मी बोगदा व टनेलमध्ये एक नंबर आहे. त्यामुळे बोगदाही होईल आणि शहराची पाणी योजनाही मंजूर होईल. याशिवाय शेतीपूरक उद्योग, पर्यटनास चालना दिली जाईल. केंद्रात मोदींचे व राज्यात महायुतीचे डबल इंजिन सरकार असेल तर विकासाचा वेग डबल होतो. केंद्र सरकार राज्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहे. यामुळे विकासासाठी मतदारांनी महायुतीच्या उमेदवार आमची लाडकी बहीण संजना जाधव यांना निवडून द्यावे, असे ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी यावेळी आपल्या खास शैलीत महाविकास आघाडीवर फटकारेही ओढले. हे घेणाऱ्यांचे नव्हे देणाऱ्यांचे सरकार मुख्यमंत्री पुढे म्हणाले, हे घेणाऱ्यांचे नव्हे तर देणाऱ्यांचे सरकार आहे. एका मुलीच्या आत्महत्तेची बातमी कळाल्यानंतर आम्ही लगेचच मुलींना डॉक्टर, इंजिनिअर, वकील बनता यावे म्हणून त्यांच्या उच्च शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलला. आम्हाला लाडक्या बहिणींना लखपती होताना बघायचे आहे. सरकार लाडकी बहीण योजनेमधील अर्थसहाय्य 1500 वरून 2100 रुपये करणार आहे. एस.टी. महामंडळ तोट्यात होते. पण आम्ही आमच्या भगिनी व ज्येष्ठ नागरिकांना सवलत दिली. त्यानंतर त्यानंतर आमच्या लाडक्या बहिणी एसटी प्रवास करायला लागल्या. त्यातून तोट्यातील एसटी नफ्यात आली. शिंदे म्हणाले, आघाडी सरकार विविध विकास प्रकल्प पाडणारे होते. आता विकास कामात, चांगल्या योजनांत खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा, असे म्हणत यावेळी त्यांनी ‘एक बार ठाण ली तो मैं खुद की भी नहीं सुनता’, असा हिंदी चित्रपटातील एक डायलॉग हाणला. तसेच महायुतीच्या सर्वच योजना केंद्राच्या मदतीने प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार व्यक्त केला. शिवसेना ही आपली आई आहे. आता तिच्या पाठीत खंजीर खुपसणारे लोक घरी बसलेत. विरोधक जाती-जातीत मराठा-ओबीसीत फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. ते लाडकी बहीण योजनेसह विविध योजनांना विरोध करत आहे. मलाही तुरुंगात डांबण्याची भाषा करत आहेत. पण मी बाळासाहेब व आनंद दिघे यांचा चेला आहे. माझी माझ्या बहिणी व शेतकऱ्यांसाठी हजारवेळा तुरुंगात जाण्याची तयारी आहे. दिव्य मराठीच्या वृत्ताची घेतली दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिव्य मराठीच्या एका बातमीची दखल घेत त्यात नमूद सर्वच विकास योजनांवर योग्य ती कारवाई करण्याची ग्वाही दिली. ‘मुख्यमंत्र्यांच्या आगमनाने सामान्य मतदारांच्या अपेक्षा वाढल्या’ या मथळ्याखाली दिव्य मराठीने कन्नड शहरातील विविध प्रश्नांचा उहापोह केला होता. त्यावर बोलताना शिंदे म्हणाले, यामध्ये टनल आणि बोगद्यात शिंदे एक नंबर असून समृद्धी महामार्गवरील जेवढे बोगदे टनल बनले ते आपल्याच काळात बनलेत. त्यामुळे कन्नड बोगदा मार्गी लागेल. शिवाय कन्नड शहराच्या पाणी पुरवठा योजनेस सरकारने मंजुरी दिली आहे. त्यासाठी 53 कोटी 36 लाख रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे. ही योजना निवडणुकीनंतर लगेच कार्यान्वित होईल. ग्राम सडक योजने अंतर्गत सर्व रस्ते, 100 खाटांचे हॉस्पिटल व कार्डियाक रुग्णवाहिका, कन्नड तालुका पर्यटन विकाससाठी चालना, फूड प्रोसेसिंग युनिट, केंद्राच्या मदतीने राज्य शासन शेतमालाला 20 टक्के भाव वाढ दिली जाईल, इंजिनिअरिंग आणि कृषी महाविद्यालयाला मान्यता देण्यात येईल, महायुतीची सत्ता आल्यानंतर सर्वप्रथम हे काम केले जाईल, असे शिंदे म्हणाले. खासदार भुमरेंनी केली मुख्यमंत्र्यांची प्रशंसा मी गत 30 वर्षांपासून आमदार आहे. पाच वर्षांपासून कॅबिनेट मंत्री होतो. मुख्यमंत्री यांची कामाची पद्धत निराळीच आहे. सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्याची हातोटी असलेला असा नेता मी बघितला नाही. जो कधीच झाला नाही असा विकास त्यांनी अडीच वर्षात करून दाखवला, असे संदिपान भुमरे यावेळी बोलताना म्हणाले. अनेकांचा शिवसेनेत प्रवेश मुख्यमंत्र्यांच्या सभेला बंजारा महिला आपल्या पारंपरिक वेशभूषेत आल्या होत्या. शिंदेंनी त्यांचा विशेष उल्लेख केला. यावेळी बबनराव बनसोड, इंद्रजित चव्हाण, काकासाहेब कवडे, विकास बागुल, रत्नाकर पंडित, ज्ञानेश्वर राऊत, प्रवीण शिंदे, रावसाहेब पवार, प्रमोद काळे, कविता पंडित आदी स्थानिक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

  

Share