बोल्डा फाटा शिवारात बाभळीच्या काट्यांमध्ये सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली:मयत तरुण गंगाखेडचा रहिवासी असल्याचे स्पष्ट

आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत बोल्डाफाटा शिवारात बाभळीच्या काट्यांमध्ये सापडलेल्या मृतदेहाची रविवारी ता. 13 सकाळी ओळख पटली असून सदर मृतदेह गंगाखेड येथील तरुणाचा असल्याचे स्पष्ट झाले. तो पोतरा येथे यात्रेसाठी आला होता. मात्र उत्तरीय तपासणीच्या अहवालानंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत बोल्डा फाटा शिवारात शनिवारी ता. 12 सकाळी बाभळीच्या झाडाच्या काट्यांमध्ये एक मृतदेह असल्याची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, उपनिरीक्षक गणेश घोटके, जमादार पंढरी चव्हाण, परमेश्‍वर सरकटे, प्रविण चव्हाण यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. सदर मृतदेहाचे वय सुमारे 40 ते 45 वर्ष असून तो व्यक्ती मागील दोन दिवसांपुर्वी काट्यांत पडला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मृतदेहाचा चेहरा काळा पडला असून त्याची ओळख पटविण्याचे काम सुरु केले होते. त्यानुसार सोशल मिडीयावर घटनास्थळाचे छायाचित्र पाठविण्यात आले होते. त्यानंतर सदर मृतदेह गंगाखेड किंवा अंबाजोगाई येथील तरुणाचा असावा अशी प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. त्यावरून पोलिस निरीक्षक गुठ्ठे, जमादार चव्हाण यांनी त्या भागात माहिती पोहोचवली. त्यानंतर आज सकाळी त्या मृतदेहाची ओळख पटली असून सदर मृतदेह सुनील तुकाराम एंगडे (45, रा. गंगाखेड) यांचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यांचे नातेवाईक दाखल झाले असून त्यांनीही मृतदेह सुनील यांचाच असल्याचे सांगितले. दरम्यान, सुनील यांचे वडिल पोतरा येथे नोकरीस होते. त्याचे शिक्षणही पोतरा येथे झाले. तो दरवर्षी यात्रेसाठी पोतरा येथे येत होते. त्यानुसार यावर्षीही तो यात्रेसाठी आला होता. त्यानंतर हा प्रकार घडला. आता उत्तरीय तपासणीनंतरच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मयत सुनील यांच्या पश्‍चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

  

Share