महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग. आज संपूर्ण पंढरी वारकऱ्यांच्या भक्तिमय वातावरणात, टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठलाच्या जयजयकारात दुमदुमून निघत आहे, कारण आज आहे आषाढी एकादशी. या निमित्ताने अनेक मान्यवर पंढरपुरात दर्शनासाठी जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पांडुरंगाची पूजा सकाळी पार पडली. त्यानंतर अनेकांनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखिल मराठीत आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “आषाढी एकादशीच्या या पवित्र दिनाच्या मनोभावे शुभेच्छा! आपल्यावर विठ्ठलाचे आशीर्वाद सदैव असेच कायम राहोत हीच विठ्ठलाच्या चरणी आपली प्रार्थना आणि कामना. भगवान विठ्ठल आपल्याला आनंदी आणि समृद्धीमय समाजासाठी मार्गदर्शन करत राहो, आणि आपणही गरीब आणि वंचितांची सेवा करत राहू या”, असे त्यांनी ट्विट करत म्हटले आहे.