मूलभूत सुविधांअभावी मतदानावर श्रीकृष्णनगर वासीयांचा बहिष्कार:अंजनगाव सुर्जी तालुका प्रशासनाला संतप्त नागरिकांनी दिले निवेदन

शहरातील राष्ट्रीय महामार्गाला लगत असलेल्या शहरातील श्रीकृष्ण नगर येथील नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाला वेळो वेळी निवेदन देऊन सुद्धा मूलभूत सुविधा व समस्यांचे निराकरण न केल्यामुळे निगरगट्ट कारभाराला कंटाळून विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन अंजनगाव सुर्जीच्या तहसीलदार पुष्पा सोळंके यांच्यासह तालुका व जिल्हा प्रशासनाला दिले आहे. अंजनगाव शहरातून राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. कामादरम्यान या रस्त्याची उंची वाढली. रस्त्याचे काम होण्यापूर्वीच कित्येक वर्षांपूर्वी वसलेले श्रीकृष्ण नगर या बांधकामामुळे खाली गेले. त्यामुळे या भागातील सांडपाण्याचा निचरा होत नाही. ते परिसरातच तसेच नागरिकांच्या घरासमोर साचून राहत असल्याने नागरिकांना दुर्गंधीसह आरोग्य व अन्य समस्यांचा सामना करावा लागत आहे. याबाबत श्रीकृष्ण नगर वासियांनी नगर पालिका प्रशासनाला कित्येक वेळा निवेदन दिलीत. परंतु, नगर पालिका प्रशासनाने या भागातील नाल्यांमधील सांडपाणी जाण्याकरिता कुठल्याही उपाय योजना केल्या नाहीत. त्यामुळे या नाल्यांमधील पाणी रस्त्यावर साचायला लागले. सद्यस्थितीत संपूर्ण रस्त्यावर सांडपाण्याचे डबके कित्येक महिन्यांपासून साचलेले आहे.परिणामी कधी कधी या डबक्यातील पाणी परिसरातील नागरिकांच्या घराच आवारात सुद्धा शिरते. या सांडपाण्याच्या समस्येमुळे येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून मागील तीन-चार महिन्यापासून टायफाईड, डेंग्यूसारख्या आजारांनी डोके वर काढले असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. वेळोवेळी लोकप्रतिनिधींना सुद्धा याबाबत माहिती दिली. मात्र समस्या सुटली तर नाही, ती जैसे थे राहिली. सलगच्या या त्रासाने त्रस्त झालेल्या श्रीकृष्ण नगरवासीयांनी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला असून त्या बाबतचे निवेदन तहसील प्रशासनासह नगर पालिका प्रशासन, स्थानिक खासदार, महसूलचे विभागीयअधिकारी इत्यादींना दिले आहे. निवेदन देते वेळी सुरेश गावंडे, चंद्रशेखर ठाकरे, दिलीप घोगरे, प्रदीप येऊल, स्वप्निल गावंडे, महेंद्र परांडे, हर्षद काळमेघ, प्रदीप वानखडे, प्रशांत पाटील आदींसह वर श्रीकृष्ण नगरातील रहिवासी उपस्थित होते. महामार्ग झाला तेव्हापासून सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने नागरिकांना सांडपाण्याच्या समस्येसह दुर्गंधी व आरोग्याच्या तक्रारीचा सामना करावा लागत आहे. वारंवार तालुका प्रशासनासह स्थानिक नगर पालिकेकडे याबाबत तक्रारी करूनही त्याची दखल घेण्यात येत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

  

Share