बुलडाण्यातील अमडापूर येथे शुक्रवारी रात्री ‘हिट अँड रन’चा प्रकार:दोन चुलत भावांसह मित्राचा जागीच मृत्यू; अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

बुलडाणा जिल्ह्यातील अमडापूर येथे शुक्रवारी रात्री ‘हिट अँड रन’ चा प्रकार समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या अपघातामध्ये चिखली वरुन उदयनगर कडे जाणाऱ्या तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही धडक एवढी जोरदार होते की, हे तरुण जागेवरच मृत पावले. या घटनेनंतर अज्ञात वाहन चालकांने घटनास्थळावरून पळ काढला. आता या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून वाहनाचा शोध सुरू आहे. बुलडाणा जिल्ह्यामध्ये हृदय पिळवटून टाकणारी ही घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी वरील तीन तरुणांचा जागच मृत्यू झाला. या मृतांमध्ये पंचवीस वर्षे वयाचा प्रतीक भुजे, 26 वर्षे वयाचा प्रथमेश भुजे आणि सौरभ शर्मा या तीन तरुणांचा समावेश आहे. याती प्रतीक आणि प्रथमेश हे चुलत भाऊ असून सौरभ हा त्यांचा मित्र होता. हे तिघे चिखलीहून उदयनगर येथे जात होते. मात्र, त्याचवेळी अमडापूर परिसरात त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोडदार धडक दिली. सदरील घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. तसेच तिन्ही तरुणांचे मृतदेह पुढील तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सध्या पोलिस करत आहेत. त्या माध्यमातून धडक देणाऱ्या वाहनाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र या अपघातात तिन्ही तरुणांचा असा अंत झाल्यामुळे बुलडाणा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. या अपघातातील वाहन चालकाला लवकरात लवकर अटक करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.

  

Share