रुपयाच्या घसरणीला केंद्र सरकार जबाबदार नाही:गुरुत्वाकर्षण आणि जीएसटीमुळे वेगाने घसरत असावा, रोहित पवारांचा खोचक टोला

भारतीय रुपयाने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत 23 डिसेंबर रोजी निचांकी पातळी गाठली. रुपया आतापर्यंतच्या 85.11 रुपये प्रति डॉलर या सर्वकालीन नीचांकीवर घसरला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. रुपयाच्या घसरणीला केंद्र सरकार जबाबदार नाही, तर गुरुत्वाकर्षण शक्ती आणि त्यात जीएसटी अधिक असल्याने तो घसरत असावा, असा खोचक टोला रोहित पवार यांनी लगावला. 23 डिसेंबर रोजी रुपयाने विक्रमी नीचांकी पातळी गाठली. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 7 पैशांची घसरण झाली आणि तो 85.11 रुपये प्रति डॉलर या सर्वकालीन नीचांकी पातळीवर बंद झाला. यापूर्वी 19 डिसेंबर 2024 रोजी डॉलरच्या तुलनेत रुपया 85.08 वर बंद झाला होता. रुपयाची घसरण झाल्यामुळे भारतासाठी वस्तूंची आयात महाग होणार आहे. यावरून रोहित पवार यांनी सोशन मीडिया एक्सवर पोस्ट करत सरकारवर टीका केली आहे. काय म्हणाले रोहित पवार? डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला, सध्या वृत्तपत्रात अशा बातम्या रोजच दिसतात, पण याला केंद्र सरकार किंवा अर्थमंत्री हे जबाबदार नाहीत. कारण नक्कीच पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती वाढत असल्याने रुपया वर जाण्याऐवजी खाली घसरत असावा आणि त्यातच जीएसटी अधिक असल्याने तो जरा जास्तच वेगाने घसरत असावा, असा खोचक टोला रोहित पवार यांनी लगावला. आजच्या काळात वस्तुस्थिती सांगितली, तरी ऐकणार कोण? असा सवाल करत कुणी ऐकणारे असेल तर याकडे लक्ष द्यावे, एवढीच अपेक्षा असल्याचे रोहित पवार म्हणाले. या कारणांमुळे रुपया घसरला
तज्ज्ञांच्या मते ही घसरण डॉलरच्या मजबूतीमुळे आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे झाली आहे. विदेशी चलन व्यापाऱ्यांनी भारतीय रुपयाच्या घसरणीचे श्रेय अमेरिकन डॉलरला असलेली मजबूत मागणी आणि भू-राजकीय अनिश्चिततेमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ दिली आहे. चलनाचे मूल्य कसे ठरवले जाते?
डॉलरच्या तुलनेत इतर कोणत्याही चलनाचे मूल्य कमी झाले, तर त्याला चलन पडणे, तुटणे, कमजोर होणे असे म्हणतात. तर इंग्रजीमध्ये करन्सी डेप्रिशिएशन असे म्हणतात. प्रत्येक देशाकडे परकीय चलनाचा साठा असतो. याद्वारे देश आंतरराष्ट्रीय व्यवहार करतात. परकीय गंगाजळीतील वाढ आणि घट यांचा परिणाम चलनाच्या किमतीवर दिसून येतो. भारताच्या परकीय गंगाजळीतील डॉलर्स हे अमेरिकेच्या रुपयाच्या गंगाजळीएवढे असतील तर रुपयाचे मूल्य स्थिर राहील. आपला डॉलर कमी झाला, तर रुपया कमजोर होईल; याला फ्लोटिंग रेट सिस्टम म्हणतात.

  

Share