दिव्य मराठी विशेष:नीट-यूजी परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी तज्ज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशी केंद्र सरकार लागू करणार

नीट-यूजीसारख्या महत्त्वाच्या परीक्षांमधील गैरप्रकार, गैरव्यवहार रोखण्यासाठी तज्ज्ञांच्या सात सदस्यीय समितीने केलेल्या शिफारशी केंद्र सरकार लागू करणार आहे, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी देण्यात आली. निवृत्त इस्रो प्रमुख के.राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे काम आणि कार्यप्रणालीचे अवलोकन केल्यानंतर ही समिती स्थापन करण्यात आली होती. नीट -यूजी परीक्षा अधिक पारदर्शक व गैरप्रकारमुक्त करण्यासाठी या समितीने बदल सुचवावे अशी कार्यकक्षा या समितीला होती. त्यानुसार समितीने देशभरातून सूचना मागवल्या होत्या. त्यानंतर समितीने केंद्र सरकारला अहवाल सादर केला. गुरुवारी न्या. पी.एस. नरसिंहा आणि न्या.मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकार सर्व शिफारशी लागू करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, गेल्या वर्षी २ आॅगस्ट रोजी गैरप्रकारातील आरोपांच्या सुनावणीनंतर न्यायालयाने परीक्षा रद्द करण्यास नकार दिला होता. देशभरातून ३७ हजार सूचनांनंतर समितीने केल्या १०१ शिफारशी समितीने देशभरातून आलेल्या ३७,१४४ सूचना, २३ बैठकांनंतर १०१ शिफराशी केल्या आहेत त्यापैकी काही प्रमुख पुढीलप्रमाणे : 1. देशात १०१ चाचणी केंद्रे असावीत. ते शासकीय शाळा, कॉलेज, संस्थांमध्ये असावे. पोलिस पडताळणीनंतरच खासगी संस्थांना केंद्र देण्यात यावे. दुर्गम भागात बसमध्ये फिरते चाचणी केंद्र तयार करावेत. 2. पेपर सेटिंग, छपाई, स्टोअरेज व वाहतुकीसह प्रश्नपत्रिकेशी संबंधित प्रत्येक प्रक्रियेवर निगराणीसाठी एनटीएचा वरिष्ठ अधिकारी अनिवार्य केला जावा.
3. एनटीएने केवळ उच्च शिक्षण प्रवेशासाठी १५ प्रवेश परीक्षा घ्याव्यात. भरती परीक्षा घेऊ नयेत.
4. नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे पुनर्गठन करावे. १० व्हर्टिकल असावे. सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांचा या समितीत समावेश असावा.
5. डिजी यात्राच्या धर्तीवर डिजी एक्झाम व्यवस्था विकसित करावी. प्रत्येक प्रक्रियेवर सीसीटीव्हीची निगराणी असावी. त्याचे फुटेजही वर्षभर सांभाळून ठेवावेत.
6. एनटीएने भविष्यातील सर्व परीक्षांमध्ये संगणक प्रणालीने सुरक्षित अशा पेन-पेपर मोडचा अवलंब करावा.
7. विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी विशेष सेल स्थापन करण्यात यावा.
8. परीक्षांचा तणाव कमी करण्यासाठी मेंटल हेल्थ सेल व टेली हेल्पलाइन सेवा असावी.

Share