चंद्रकांत पाटील:पूर्णवेळ प्रचारक ते भाजपचे मंत्री; पुणे पदवीधर मतदार संघाच्या माध्यमातून पहिल्यांदाच विधिमंडळात आता पुन्हा मंत्री

माजी मंत्री आणि कोथरुड विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजयी झालेले चंद्रकांत पाटील यांची देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. चंद्रकांत पाटील यांचा जन्म 10 जून 1959 साली एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील बच्चू पाटील हे मिल कामगार होते. मुंबईमधील प्रभुदास चाळीमध्ये त्यांचे लहानपण गेले. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईमधील दादर येथील राजा शिवाजी विद्यालय म्हणजेच किंग जॉर्ज शाळेत झाले. फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालयातून 1985 साली त्यांनी पदवी प्राप्त केली. बी.कॉमचे शिक्षण घेत असतानाच, चंद्रकांत पाटील यांचा संपर्क अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसोबत आला. 1968 साली चंद्रकांत पाटील हे विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयात राहण्यासाठी आले. 1980 सालच्या ऑगस्ट महिन्यात जालन्याच्या प्रचार अभ्यास वर्गात चंद्रकांत पाटील यांच्या नावाची पूर्णवेळ प्रचारक म्हणून घोषणा झाली, आणि जळगाव जिल्ह्याला पूर्णवेळ कार्यकर्ता मिळाला. 1980 ते 1983 या कालखंडात चंद्रकांत पाटील यांनी जळगाव जिल्ह्यात गावोगावी संघटना रुजविली. नंतर त्यांच्यावर परिषदेची महाराष्ट्र संघटन महामंत्री म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली, त्यामुळे ते मुंबईत आले. सन 2004 मध्ये त्यांची प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती झाली. सन 2009 मध्ये पक्षाने त्यांना पुणे पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी दिली. या निवडणुकीत शरद पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करून त्यांनी विधान परिषदेत प्रवेश केला. सन 2023 रोजी त्यांची भाजप पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. यानंतर 2014 मध्ये झालेल्या पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा विजय संपादन करत, विधान परिषदेत पुन्हा प्रवेश केला. सन 2014 च्या विधान सभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवत, सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे सहकार, पणन, सार्वजानिक बांधकाम आदी विभागाची सूत्रे सोपवण्यात आली. 2016 पासून ते महसूल, सार्वजनिक बांधकाम या खात्यांचे मंत्री होते. तसेच राज्याचे दिवंगत कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे कृषी खात्याचा कार्यभार सोपवला होता. जुलै 2019 मध्ये त्यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती झाली होती. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी कोथरुड विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाचे उमदेवार चंद्रकांत मोकाटे यांचा पराभव केला. आता पुन्हा एकदा फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांना मंत्री करण्यात आले आहे.

  

Share