चंद्रशेखर बावनकुळेंचे निधी वळवण्याला समर्थन:म्हणाले – योजना चालवण्यासाठी थोडा थोडा निधी घेतला असेल तर काही हरकत नाही

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा सव्वा चारशे कोटींचा निधी वळवण्यात आला आहे. यावरून सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निधी वळवण्याला समर्थन दिले आहे. सामाजिक न्याय विभागात ज्या जाती आहेत, त्यांच्यात लाडकी बहिणी आहेत. यामुळे काही निधी आदिवासी विभागाचा, काही निधी सामाजिक न्याय विभागाचा, काही निधी महिला आणि बाल कल्याण विभागाचा असा थोडा थोडा निधी घेतला असेल तर काही हरकत नाही, असे बावनकुळे म्हणाले. महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना अजित पवार निधी देत नाहीत, असा आरोप एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंड पुकारताना केला होता. आता सरकार बदलले तरीही निधीचा कलह कायम आहे. तशा तर एकनाथ शिंदे विरुद्ध अजित पवार अशा कुरबुरी सुरूच होत्या. पण शनिवारी शिंदेसेनेचे नेते, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरात विशेष पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांवर थेट हल्लाबोल केला. मला अंधारात ठेवून लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय खात्याचे सव्वा चारशे कोटी रुपये वळवण्यात आल्याचे संजय शिरसाट यांनी सांगितले होते. नेमके काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, संजय शिरसाट काय बोलले, याची मला माहिती घ्यावी लागेल. लाडक्या बहिणी आदिवासी भागात आहे. सामाजिक न्याय विभागात ज्या जाती आहेत, त्यांच्यात लाडकी बहिणी आहेत. यामुळे काही निधी आदिवासी विभागाचा, काही निधी सामाजिक न्याय विभागाचा, काही निधी महिला आणि बाल कल्याण विभागाचा असा थोडा थोडा निधी घेतला असेल तर काही हरकत नाही. जेव्हा एखादी योजना चालवायची असते तेव्हा ती योजना राज्याने चालवायची असते. त्यात सामाजिक न्याय, महसूल असे वेगळे काम करत असले, तरी सामूहिक निर्णय सर्वांना लागू होतात. यासंदर्भात संजय शिरसाट यांच्याशी मी चर्चा करणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाबाबतची आपली भावना बोलून दाखवली होती. याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता, विकसित महाराष्ट्रासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. अजित पवार, एकनाथ शिंदे यांना आपला पक्ष वाढवावा, त्याला कोणाचाही आक्षेप असणार नाही. पण सरकार म्हणून आम्ही एकत्र आहोत, असे ते म्हणाले. महायुती प्रचंड मजबूत आहे. कुठेही बेबनाव नाही. कोणीची नाराजी नाही. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावाना असते आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री होणार? भाजप कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हवे आहे तसे शिवसेना कार्यकर्त्यांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हवे आहेत, तसेच अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांना तेच मुख्यमंत्री हवे आहे, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. हे ही वाचा… अर्थखात्याने शिवसेनेच्या मंत्र्यांचा निधी वळवला:संजय शिरसाटांना माहितीच नाही, म्हणाले- जातीयवाद करता येणार नाही, खातेच बंद करा! लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा सव्वाचारशे कोटी रुपयांचा निधी वळवण्यात आला आहे, मी वारंवार सांगतोय की असे करता येणार नाही पण निधी वर्ग केला जात आहे, असे म्हणत सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वीही माझ्या खात्यामधून 7 हजार कोटी रुपये वर्ग करण्यात आले होते.पूर्ण बातमी वाचा…

  

Share