चंद्रशेखर बावनकुळे:बिगरराजकीय पार्श्वभूमी असलेल्या शेतकरी कुटुंबात जन्म; कामगार आंदोलन ते राज्याच्या मंत्रीपदापर्यंत प्रवास
भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची राज्याच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. त्यांच्याच अध्यक्षपदाच्या कार्यकाळात या वेळी भाजपने आजपर्यंतचे सर्वात मोठे यश प्राप्त केले आहे. त्यांचा राजकीय प्रवासही तेवढाच खडतर आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचा जन्म कामठी येथे एका मराठी तेली कुटुंबात झाला. बिगरराजकीय पार्श्वभूमी असलेल्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बावनकुळे यांचे शिक्षण विज्ञान शाखेत झाले आहे. सुरुवातीच्या काळात ते कोराडी ते नागपूर या मार्गावर रिक्षा चालवत. त्यानंतर कोराडी मधील कोराडी महाऔष्णिक विद्युत केंद्रातील लहान – मोठे कंत्राट घेऊन त्यांनी कंत्राटदार म्हणून काम सुरु केले. औष्णिक वीज केंद्रात कंत्राटदार म्हणून काम करतांनाच ते प्रकल्पातील कंत्राटी कामगारांचे प्रश्न मांडू लागले. यातूनच कामगार नेते म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. कामगार आंदोलन काम करत असतानाच त्यांना भाजपचे नेते नितीन गडकरी यांचे मार्गदर्शक लाभले आणि त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. बावनकुळे राजकारणात नवखे होते तसेच राज्यातही भाजपचे फारसे प्रस्थ नव्हते. तरी देखील बावनकुळे यांनी एकनिष्ठपणे पक्षाचे काम केले. याच दरम्यान जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपने बावनकुळे यांना उमेदवारी दिली. त्यांनीही संधीच सोने केले आणि ते निवडून आले. त्यावेळी जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता होती. ही निवडणूक त्यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरली. जिल्हा परिषदेतील सर्वाधिक सक्रिय सदस्य म्हणून अल्पावधीतच त्यांना प्रसिद्धी मिळाली. पुढील काळात त्यांनी कामठी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे दिग्गज नेते मुकुल वासनिक यांचा परभव करत पहिल्यांदाच विधानसभेत पाय ठेवले. त्यानंतर त्यांनी सलग 3 निवडणुका जिंकल्या. 2014 मध्ये भाजपची सत्ता येताच मंत्रिपदाचा कुठलाही अनुभव नसताना त्यांना ऊर्जा खात्याचे कॅबिनेट मंत्री करण्यात आले होते. मात्र, 2019 निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. मात्र, त्यांनी पक्षनिष्ठा राखत आपले काम सुरुच ठेवले. आता पुन्हा एकदा त्यांचा विधानसभा निवडणुकीत विजय झाला असून त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.