छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक:पालकमंत्री संजय शिरसाट अध्यक्षस्थानी; अंबादास दानवेंकडून अतिरिक्त निधीची मागणी

छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पार पडली. सामाजिक न्याय तथा पालकमंत्री संजय शिरसाट हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. पालकमंत्री म्हणून शिरसाट यांनी नियुक्ती झाल्यानंतर 26 जानेवारी रोजी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले होते. त्या वेळी झालेल्या बैठकीनंतर सर्वंकष चर्चा होणारी ही पहिलीच बैठक होती. वास्तविक जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी अंबादास दानवे चांगलेच संतापल्याचे दिसून आले होते. पोलिसांनी आपल्या सहकाऱ्यांना बैठकस्थळी प्रवेश नाकारल्यामुळे ते संतापल्याचे सांगण्यात आले. कार्यकर्त्यांना रोखून धरण्यासाठी बैठकीत तलवारीने भांडण होणार आहे का? असा सवाल त्यांनी यासंबंधी पोलिसांना केला होता. त्यानंतर त्यांनी या बैठकीतही जिल्हा प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. अतिरिक्त निधीची आवश्यकता जिल्ह्यातील विकासाच्या दृष्टीने विविध प्रश्न, समस्या व सूचना मांडल्या असल्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. जिल्हा प्रशासकीय पातळीवर वित्त वर्ष 2025-26 साठी हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात आला असून जिल्ह्याची विकासात्मक कामे करण्यासाठी यापेक्षा अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्याची, भूमिका मांडली असल्याचे दानवे यांनी सांगितले. संभाजीनगर जिल्ह्यासह शहरी भागात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली आहे. तरुण मुले व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकल्याचे चित्र निर्माण झाले आहे. माता – भगिनी यांच्या सुरक्षतेचा प्रश्न गंभीर झाला आहे. पोलिस प्रशासन व पालकमंत्री यांनी या गंभीर प्रश्नांवर लक्ष देऊन तातडीने हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी यावेळी केली. समसमान निधी देण्यात यावा – दानवेंची सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी राजकीय दबावाखाली काम न करता सर्व मतदार संघ तसेच तालुक्यांना समान निधी मिळेल असे नियोजन करावे. विशिष्ट तालुक्यांमध्येच जास्तीचा निधी दिला जात असल्याचे अनेक आकडेवारी वरून दिसून येत आहे. तालुक्या – तालुक्यांमध्ये असमानतेची भावना निर्माण होऊ नये यासाठी, समसमान निधी देण्यात यावा, अशी सूचना यावेळी केली.

  

Share