छत्रपती संभाजीनगर शहराजवळ बनावट नोटा तयार करणारा कारखाना आणि या नोटा बाजारात वितरित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश अहिल्यानगर तालुका पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली असून, मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे. पोलिसांनी ५०० रुपयांच्या बनावट नोटा ज्याची एकूण रक्कम ५९ लाख ५० हजार आहे, तसेच २ कोटी १६ लाख रुपयांच्या बनावट नोटा तयार होऊ शकतील, असा कागद, अत्याधुनिक छपाई यंत्रे यासह एकूण ८८ लाख २० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईबाबत माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, तसेच तपासी अधिकारी व नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रल्हाद गीते उपस्थित होते. पोलिसांचा हा मोठा तपास आणि कारवाईमुळे बनावट नोटा रॅकेटला मोठा धक्का बसला आहे. बनावट नोटा प्रकरणात पोलिसांनी सात जणांना अटक केली असून, मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये निखिल शिवाजी गांगर्डे (वय २७, रा. कोंभळी, ता. कर्जत), सोमनाथ माणिक शिंदे (वय २५, तपोवन रस्ता, अहिल्यानगर), प्रदीप संजय कापरे (वय २८, तिंतरवणी, शिरूर कासार, बीड), मंगेश पंढरी शिरसाठ (वय ४०, शिवाजीनगर, छत्रपती संभाजीनगर), विनोद दामोदर अरबट (वय ५३, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर), आकाश बनसोडे (वय २७, निसर्ग कॉलनी, पेठेनगर, छत्रपती संभाजीनगर) आणि अनिल सुधाकर पवार (वय ३६, मुकुंदनगर, छत्रपती संभाजीनगर) यांचा समावेश आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अंबादास रामभाऊ ससाने (रा. शहरटाकळी, शेवगाव, अहिल्यानगर) सध्या फरार असून, त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, सोलापूर रस्त्यावरील अंबिलवाडी (अहिल्यानगर) शिवारात बनावट नोटा बाजारात आणण्यासाठी दोन व्यक्ती येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, २७ जुलै रोजी सापळा रचून निखिल गांगर्डे आणि सोमनाथ शिंदे या दोघांना अटक करण्यात आली. पुढील तपासात त्यांच्या माहितीवरून प्रदीप कापरे याला अटक करण्यात आली. कापरेकडून मिळालेल्या माहितीनुसार, नेवासा फाटा येथे एक व्यक्ती ५० हजार रुपयांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात १ लाख रुपयांच्या बनावट नोटा देणार असल्याचे समजले. पोलिसांनी नेवासा फाट्यावर सापळा रचून विनोद अरबट याला अटक केली आणि त्याच्याकडून ३ लाख रुपये किंमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या. त्याच्या माहितीवरून बनावट नोटा तयार करणारा कारखाना छत्रपती संभाजीनगरजवळ असल्याचे उघड झाले. यानंतर, आकाश बनसोडे, मंगेश शिरसाठ आणि अनिल (अधीर) पवार यांना अटक करण्यात आली. मात्र त्यावेळी घटनास्थळी असलेला मुख्य सूत्रधार अंबादास ससाने हा पोबारा करण्यात यशस्वी झाला. पुढील तपासात अरबट आणि शिरसाठकडून मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर शहराजवळील वाळुंज शिवारातील तिसगाव येथे एका भाड्याच्या खोलीत बनावट नोटा छापण्याचा कारखाना चालू असल्याचे निष्पन्न झाले. अंबादास ससाने याला यापूर्वीही बनावट नोटा तयार करण्याच्या प्रकरणात अटक झाली होती आणि तो औरंगाबादच्या हरसूल कारागृहात शिक्षा भोगत होता. त्याच काळात मंगेश शिरसाठ आणि आकाश बनसोडे हे दोघेही वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अटक होऊन कारागृहात होते. कारागृहातच या तिघांची ओळख झाली आणि ससाणे याने शिरसाठ व बनसोडे यांना बनावट नोटांचा व्यवसाय करून जलद पैसा कमावण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर तिघांनी मिळून बनावट नोटा तयार करण्याची योजना आखली. दरम्यान, नगर जिल्ह्यातील राहुरी पोलिसांनी गेल्या महिन्यातच सोलापूरमधील टेंभुर्णी येथे बनावट नोटा तयार करणारा कारखाना उघडकीस आणला होता आणि त्या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली होती. विशेष बाब म्हणजे त्या गुन्ह्यात आणि आताच्या प्रकरणातही कर्जत तालुक्यातील आरोपींचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दोन्ही प्रकरणांमध्ये काही संबंध आहेत का, याचा सखोल तपास केला जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. बनावट नोटा तयार करणारे हे दोन्ही कारखाने वेगवेगळ्या जिल्ह्यांत – सोलापूर व छत्रपती संभाजीनगरमध्ये – असले तरी या नोटांचा वितरण नेटवर्क नगर जिल्ह्यात सक्रिय होता. अंबिलवाडी शिवारातील एका पानटपरीवर दोनवेळा पाचशे रुपयांच्या बनावट नोटा देऊन सिगारेट खरेदी केल्याने टपरीचालकाला संशय आला आणि त्याने पोलिसांना माहिती दिली, त्यातून या रॅकेटचा पर्दाफाश झाला. जिल्ह्यात दोन बनावट नोटांच्या प्रकरणांची नोंद झाल्यामुळे आणि एक टोळी 2021 पासून सक्रिय असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे, जिल्ह्यातील प्रमुख बँक अधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्यांना आवश्यक सूचना दिल्या जाणार आहेत. बनावट नोटांचा ओळखण्यात बँकांची भूमिका महत्त्वाची असून, एखादा ग्राहक सतत संशयास्पद नोटा घेऊन येत असेल, तर बँकांनी तत्काळ खबरदारी घ्यावी, असे आवाहन घार्गे यांनी केले.