हिंदी सक्तीच्या विरोधात आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. मुंबईत पार पडलेल्या विजयी रॅलीमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. भाषणात त्यांनी फडणवीसांचा उल्लेख ‘अणाजी पंत’ असा करत टोला लगावला. यावर शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अशा प्रकारे उल्लेख करणे म्हणजे मुख्यमंत्रिपदाचा अपमान असल्याचे केसरकर यांनी म्हटले. वापरा आणि फेकून द्या ही उद्धव ठाकरेंची नीती राज्याच्या प्रमुखाला अण्णाजी पंत म्हणणं हे त्या पदाचा अपमान आहे. मुख्यमंत्र्यांची तुलना ही पेशव्यांशीही करता आली असती. राजकारणात वैचारिक मतभेद असावेत. पण ते व्यक्तिगत पातळीवर येऊ नयेत, असे स्पष्ट मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे. पुढे ते म्हणाले, दोन भाऊ एकत्र आले ही चांगली गोष्ट आहे. अन्याय झाला म्हणून राज ठाकरे बाहेर पडले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यावर राज ठाकरे यांच्यावर अन्याय होणार नाही अशी अपेक्षा. वापरा आणि फेकून द्या ही उद्धव ठाकरेंची नीती मी स्वतः अनुभवली आहे. राणेंच्या विरोधात माझा वापर करून घेतला. यूज अँड थ्रो अशी त्यांची नीती आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या भूमिकेला छेद दिला दीपक केसरकर म्हणाले, उद्धव ठाकरे यांना गेल्या दोन निवडणुकांत मिळालेली मते ही फतव्याची मते आहेत. एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचा विचार कायम ठेवला. राज ठाकरे देखील उद्धव ठाकरे यांच्या सोबत जाऊन तो विचार कायम ठेवतील अशी अपेक्षा आहे. उद्धव ठाकरे त्या विचारापासून दूर गेल्याने त्यांना सगळे आमदार सोडून गेले. बाळासाहेबांची भूमिका ही काँगेस सोबत जाणार नाही अशी होती. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या भूमिकेला छेद दिला. आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेल्यानंतर राज ठाकरेंची भूमिका काय हे लवकरच समजेल. पुढे बोलताना दीपक केसरकर म्हणाले, मूळ पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांना आता राज ठाकरेंची गरज पडली असा टोला दीपक केसरकर यांनी लगावला. तर रस्त्यावरील सत्ता कुणाकडे आहे याचे उत्तर देणार नाही. कायद्याचे पालन सर्वांना करावे लागत. राज्यात भाडंण, मारामाऱ्या होऊ नये एवढीच अपेक्षा आहे.