राज्यातील वसुलीबाजांवर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही:संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत एका वाक्यात उत्तर दिले आहे. राज्यातील सगळ्या वसुलीबाजांवर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही, असे फडणवीस यांनी म्हंटले आहे. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणी शुक्रवारी सकाळी देवेंद्र फडणवीस सविस्तर निवेदन देणार असल्याची देखील माहिती आहे. माजलगाव येथील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करत त्यांना बेदम मारहाण करत त्यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर पवनचक्की कंपनीकडून दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड येथील सर्व आमदार तसेच खासदारांनी आवाज उठवला आहे. माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी देखील या घटनेवरून सरकारवर टीका केली आहे. खासदार बजरंग सोनवणे यांनी घटनेच्या तपासासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेतली होती. दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यूचे कारण पोस्टमार्टेम रिपोर्टमुळे समोर आले आहे. यात देशमुखांच्या मृत्यूचे कारण हे ‘हॅमरेज शॉक ड्यू टू मल्टिपल इन्जुरिज’ असे देण्यात आले आहे. देशमुख यांच्या मृत्यू प्रकरणाचा शवविच्छेदन अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांना सादर केला आहे. संतोष देशमुख यांचे डोळे जाळण्यात आल्याची चर्चा सुरू होती. देशमुख यांच्या छाती, हात-पाय, चेहरा, डोके या भागात मारहाण करण्यात आली आहे. त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्याचा भाग मारहाणीमुळे काळा-निळा पडल्याने ही चर्चा सुरू झाली होती. डोळे जाळल्याला दुजोरा नाही
संतोष देशमुख यांचा मृत्यू जबर मारहाणीमुळे झालेला असून त्यांच्या शरीरावर मुकामार दिसत आहे. त्यांचे डोळे काढणे किंवा लेझरने डोळे जाळणे या आरोपाला शवविच्छेदन अहवालात दुजोरा देण्यात आलेला नाही. पाठ, डोके व संपूर्ण शरीरावर मुकामार व जखमा दिसून आल्या आहेत.

  

Share