मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना नागपूर खंडपीठाचे समन्स:विधानसभा निवडणुकीतील विजयाला आव्हान; 8 मेपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समन्स बजावले आहे. त्यांना 8 मेपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मागील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या 26 उमेदवारांनी महायुतीच्या विजयी उमेदवारांच्या विजयाला आव्हान दिले आहे. दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातून काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे यांनी फडणवीसांविरुद्ध निवडणूक याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने बुधवारी भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रवादीचे मनोज कायंदे आणि भाजपचे देवराव भोंगळे यांनाही समन्स बजावले. गुरुवारी भाजपचे मोहन मते आणि चिमूरचे आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनाही न्यायालयाने नोटीस पाठवली. याचिकाकर्त्यांनी ईव्हीएम संदर्भात गंभीर आरोप केले आहेत. निवडणूक आयोगाने ईव्हीएमद्वारे निवडणूक घेण्यापूर्वी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नसल्याचा आरोप आहे. तसेच पराभूत उमेदवारांना सीसीटीव्ही फुटेज आणि फॉर्म क्रमांक 17 दिले जात नसल्याचेही म्हटले आहे. न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांनी निवडणूक आयोग आणि इतर प्रतिवादींची नावे वगळून केवळ विजयी उमेदवारांना नोटीस बजावली आहे. मते यांना 6 मे तर भांगडिया यांना 8 मेपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकाकर्त्यांच्या बाजूने ॲड. आकाश मून यांनी बाजू मांडली.

  

Share