मुख्यमंत्र्यांनी ठोस आश्वासन दिले नाही:संतोष देशमुख हत्या प्रकरणी जयंत पाटलांची प्रतिक्रिया

बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत असल्याचे दिसत आहे. संतोष देशमुख यांचे अपहरण करत त्यांना बेदम मारहाण करत त्यांची हत्या करण्यात आल्याने राज्यभर एकच खळबळ उडाली आहे. या घटनेवरून विरोधकांनी सरकारला चांगलेच घेरले आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनात देखील विरोधकांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या विरोधात आवाज उठवला आहे. यावर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी कोणतेही ठोस आश्वासन दिले नसून फक्त गोल गोल भाषण केले असल्याची टीका जयंत पाटलांनी केली आहे. जयंत पाटील म्हणाले, विरोधकांनी बीडच्या घटनेबाबत सभागृहात माहिती दिली. ती माहिती खरी समजून त्यावर ठोस कारवाई केल्याचे निदर्शनास येत नाही. एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी करायची अशा दोन चौकशीची काय आवश्यकता? न्यायालयीन चौकशीच करायला पाहिजे. आता एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र, हे एकंदरीत गोल गोल उत्तरे होती. त्यामुळे निष्कर्षापर्यंत सरकार येत नाही, असे जयंत पाटील म्हणाले आहेत. पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, सभागृहात जी सर्व भाषणे झाली. त्या सर्व प्रश्नांना ठोस उत्तर मिळणे अपेक्षित होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारे उत्तर दिले. त्यामध्ये असा जोरकसपणा नव्हता, म्हणजे आम्ही एवढ्या दिवसांत कारवाई करू, 24 तासांत अटक करू किंवा 48 तासांत अटक करू, असे ठोस आश्वासन त्यांनी दिले नाही. एवढेच नाही तर संपूर्ण भाषणात अटक करण्यासंदर्भात त्यांनी शब्दही उच्चारला नाही. त्यामुळे आता पाहू सरकार काय कारवाई करते. बीडच्या घटनेत काय काय झाले हे माहिती असूनही मु्ख्यमंत्र्यांनी सविस्तर सांगितले नाही. फक्त गोल गोल भाषण करून उत्तर दिले, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

  

Share