नागपूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रातील निवडणुका जिंकून देण्याची ऑफर घेऊन आलेल्या दोघांना आपण राहुल गांधींकडे घेऊन गेल्याचे शरद पवारांनी सांगितले होते. मात्र त्यांनी याबाबत पोलिस किंवा निवडणूक आयोगाकडे तक्रार केली नाही. “याचा सरळ अर्थ असा होतो की तुम्ही त्या माणसांचा वापर करून पाहिला का?” असा सवाल फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला. ते म्हणाले, “मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटते की मोठ्या नेत्यांकडे अशा प्रकारे काही जण निवडणूका प्रभावित करण्याची आयडिया घेऊन जातात. ते केवळ एकमेकांशी भेटी घालून देतात.” फडणवीस यांनी पुढे म्हटले, “ते पोलिसांकडे तक्रार करीत नाहीत. निवडणूक आयोगाकडे जात नाहीत. त्यावर कारवाईही करीत नाहीत. अशा प्रकारच्या गोष्टी करणे म्हणजे कथा रचण्यासारखे आहे.” ईव्हीएमबाबतही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “निवडणूक आयोगाने अनेकदा ईव्हीएमला हॅक करून दाखवण्याचे खुले आव्हान दिले होते. कोणीही आले नाही आणि हॅक केली नाही. तुमच्याकडे कोणी असेल तर निवडणूक आयोगाकडे घेऊन जा,” असे आवाहन त्यांनी केले. राहुल गांधींवरही फडणवीसांनी टीका केली. “राहुल गांधी निवडणूक आयोगासमोर जाण्यास तयार नाहीत. आयोग त्यांना नोटिस देत आहे, पत्र देत आहे, जाहीर निमंत्रण देत आहे. तिथे ते बोलत नाहीत. ‘गोळ्या झाडा आणि पळून जा’ हेच त्यांचे धोरण आहे,” असे फडणवीस म्हणाले. ठाकरे गटाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, “ठाकरे एकत्रित आले तर त्यांनी एकत्र राहावे, नांदावे, लढावे, काय करायचे ते करावे.” महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आत्मविश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ५१ टक्क्यांनी जिंकणार आहोत. मतदारयादी दुरुस्त करून घ्या.”