मुंबई केंद्रशासित प्रदेश घोषित करा:काँग्रेस MLA च्या मागणीने आदित्य ठाकरे भडकले; संतप्त सुरात म्हणाले – त्या आमदाराला बरखास्त करा

महाराष्ट्र एकीकरण समितीने सरकारकडे बेळगावच्या सीमावर्ती भागाला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. कर्नाटकचे काँग्रेस आमदार लक्ष्मण सौदी यांनीही या समितीच्या सुरात सूर मिसळत मुंबईला केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्याची मागणी केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ही मागणी धुडकावून लावत काँग्रेसकडे सौदी यांना पक्षातून बरखास्त करण्याची मागणी केली आहे. आदित्य ठाकरे गुरुवारी विधिमंडळ परिसरात बोलताना म्हणाले की, काँग्रेस असो की भाजप कोणत्याही नेत्याने बेळगाव किंवा महाराष्ट्राचा अवमान केला असेल तर ते सहन केले जाणार नाही. मुंबईला केंद्रशासित करण्याचा विषय बोलणाऱ्या आमदाराला तत्काळ बरखास्त करण्याची गरज आहे. मराठी माणसांनी मुंबई मिळवण्यासाठी भरपूर संघर्ष केला आहे. हा संघर्ष विसरता येणार नाही. मुंबई ही आमची मायभूमी आदित्य ठाकरे यांनी यासंबंधी एक ट्विटही केले. त्यात ते म्हणाले, मुंबई केंद्रशसित करण्याची मागणी निषेधार्ह आहे. काँग्रेस असो वा भाजप… कोणताही पक्ष असो… मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अजिबात खपवून घेणार नाही. मुंबई ही आमची मायभूमी आहे. इथला प्रत्येक कण मराठी माणसानं आपलं रक्त सांडून मिळवला आहे. मुंबई आम्हाला कोणी आंदण दिलेली नाही. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी आपल्या आमदारांना समज द्यावी. मंत्री शंभूराज देसाई यांचा कानडी सरकारवर हल्ला दुसरीकडे, शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनीही या प्रकरणी कर्नाटक सरकारवर कडाडून हल्ला चढवला आहे. ते म्हणाले की, कर्नाटक सरकारने सीमा भागातील मराठी भाषिकांच्या अधिकारांना डावलण्याचे काम केले. मागील सरकारच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नावर उपाय शोधण्यासाठी मंत्र्यांची समन्वय समिती नियुक्त केली होती. पण कर्नाटक सरकारने महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाला बेळगावला भेट देण्यास मनाई करून हा प्रयत्न हाणून पाडला. कर्नाटक सरकारची ही दादागिरी अनेक वर्षांपासून सुरू आहे. मुंबईची बेळगावशी तुलना करणे चुकीची शिवसेनेचे अन्य एक मंत्री गुलाबराव पाटील यांनीही यावेळी बेळगाव व मुंबई याची तुलना करणे चुकीचे असल्याचे सांगितले. मुंबईने केव्हाच बेळगावसारखे कुठल्याच भाषिकावर अन्याय केला नाही. त्यामुळे बेळगाव व मुंबई याची तुलना करणे चुकीचे आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून, बेळगाव केंद्रशासित प्रदेश जाहीर झाला पाहिजे ही आमची मागणी आहे, असे ते संतप्त सुरात म्हणाले.

  

Share