बडनेरा रेल्वे स्टेशनवर तिकीट‎आरक्षण कक्षाचे निर्माण सुरू‎:मोफत वायफाय, ईरिक्षाची सोय

बडनेरा रेल्वे स्टेशनचा हळूहळू कायापालट होत आहे. रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर आधी खड्डे होते. तेथे आता सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार होत आहे. त्याचप्रमाणे अमृत दोन योजनेंतर्गत बडनेरा स्टेशनवर आता तिकीट आरक्षण कक्षाचे निर्माण कार्य सुरू झाले असून, ते पूर्ण झाल्यानंतर येथून रेल्वे तिकीट आरक्षित करता येणार आहे. हे आरक्षण केंद्र अद्ययावत राहणार आहे. सध्या बडनेरा रेल्वे स्टेशनच्या बाहेर काम सुरू आहे. वाहनांच्या पार्किंगसाठी शेडचे निर्माण केल्यानंतर जयहिंद व चांदणी चौकाकडून रेल्वे स्टेशनकडे येणाऱ्या दोन प्रवेशद्वारांचीही निर्मिती झाली आहे. यासोबतच रेल्वे स्टेशनपर्यंत येणाऱ्या सर्वच मार्गांचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. स्टेशनवरील जुना पादचारी पूल बंद करून नवीन पुलाची उभारणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्लॅटफॉर्मची संख्या वाढवून त्यांनाही व्यवस्थित केले जात आहे. दोन्ही बाजूने प्रवाशांना येणे व बाहेर पडण्याची सोय होणार आहे. सोबतच एका बाजूने एस्केलेटर बसवले असून, दुसऱ्या बाजूने एस्केलेटर बसवण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे प्लॅटफॉर्म क्र. १ व २ वर लिफ्ट बसवल्या आहेत. प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे. एवढेच नव्हे तर सामान्य तिकीट दोन्ही मुख्य दरवाजाच्या जवळच मिळते. त्यामुळे प्रवासी तिकीट घेतले की, तत्काळ स्टेशनमध्ये प्रवेश करू शकतात. बडनेरा हे मध्य रेल्वेचे महत्त्वाचे तसेच व्यस्त स्टेशन असल्यामुळे येथे सतत लांब पल्ल्याच्या गाड्यांचे आवागमन होत असते. तसेच मेमूची सोय असल्यामुळे येथे जवळच्या स्टेशनवर जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी असते. मुंबई, पुणे, अहमदाबाद, नागपूर, हावडा, चेन्नई या महानगरांकडे जाण्यासाठी बडनेरा स्टेशन सोयीचे मानले जाते. मोफत वायफाय, ईरिक्षाची सोय प्रवाशांना बडनेरा रेल्वे स्टेशनवर मोफत वायफाय सुविधा मिळत असून, ज्या प्रवाशांना चालता येत नाही किंवा ज्यांच्याकडे सामान जास्त आहे, अशा प्रवाशांना नेणे-आणणे करण्यासाठी प्लॅटफॉर्मवर ई-रिक्षाची सोय करण्यात आली आहे. यासोबतच प्रतीक्षालय, प्रसाधनगृह, प्रवाशांसाठी सूचना यंत्रणा, स्वच्छता आणि स्टेशनचे सौंदर्य वाढवण्यासाठी उद्यानाची निर्मिती केली जात आहे. सोबतच प्लॅटफॉर्मचे सौंदर्यही वाढवले जाणार आहे.

  

Share