‘नीट’ परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने शिक्षक असलेल्या बापाने पोटच्या मुलीला लाकडी खुंट्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत या 17 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेने सांगलीच्या आटपाडी गावात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपी वडिलांना पोलिसांनी अटक केली असून मुलीच्या आईने फिर्याद दिली होती. प्रकरणातील अधिकची माहिती अशी की, मुलगी साधना भोसले (17) ही आटपाडी येथे बारावीत विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती. तिचे वडील धोंडीराम भोसले हे मुख्याध्यापक आहेत. साधनाला बारावीच्या चाचणी परीक्षेत कमी मार्क मिळाले होते याची माहिती वडिलांना कळताच ते संतापले. शुक्रवारी रात्री 9.30 च्या सुमारास वडिलांनी साधनाला रागावण्यास सुरू केले त्यानंतर संतापलेल्या वडिलांनी लाकडी खुंट्याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत साधना गंभीर जखमी झाली व त्यातच तिचा मृत्यू झाला. साधनाला डॉक्टर बनायचे होते, परंतु नीटच्या चाचणी परीक्षेत तिला कमी मार्क मिळाले होते. कमी मार्क पडले म्हणून वडील धोंडीराम संतापले आणि रागाच्या भरात बेदम मारहाण केली. या मारहाणीत साधना गंभीर जखमी झाली होती. तिला रुग्णालयात उपचारासाठी न नेता दुसऱ्या दिवशी वडील धोंडीराम योग दिन साजरा करण्यासाठी शाळेत निघून गेले. घरी परतल्यावर साधना बेशुद्ध अवस्थेत त्यांना आढळून आली. त्यांनी रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचार घेण्यापूर्वीच साधनाचा मृत्यू झाला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोटच्या लेकीला अशी अमानुष मारहाण करणाऱ्या आरोपी बापाबद्दल संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी साधनाच्या आईच्या फिर्यादीवरून वडील धोंडीराम भोसले यांना अटक केली आहे.