देशमुख विद्यालयात विद्यार्थ्यांना पक्ष्यांसाठी केले घरटे, जल पात्र:हरी सेवा फाउंडेशनच्या वतीने वाटप; मान्यवरांची उपस्थिती
प्रतिनिधी | शेंदुरजनाघाट जरुड येथील बाळासाहेब देशमुख जरुडकर माध्यमिक विद्यालयात हरी सेवा फाउंडेशनच्या वतीने पक्षी संवर्धनाकरिता शाळेतील विद्यार्थ्यांना घरटे आणि जलपात्राचे नुकतेच वाटप करण्यात आले. परिसंस्थेची साखळी अबाधित ठेवण्यामध्ये पक्ष्यांची भूमिका महत्त्वाची असते. वाढत्या उन्हामुळे पक्ष्यांच्या प्रजाती लुप्त होत आहेत. त्यामुळे त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पक्ष्यांचे घरटे व जलपात्राचे वाटप करण्यात आले. पर्यावरण संवर्धनात पक्ष्यांची भूमिका या विषयावर फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन खेरडे यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. या प्रसंगी फाउंडेशनचे सचिव रामभाऊ राऊत यांनी स्वतः तयार केलेले घरटे व जलपात्रांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी डॉ. मनोहर आंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उमेश निस्ताने यांनी विद्यार्थ्यांना परिसरातील विविध घटकांवर प्रश्न विचारले. वरुड तालुक्यातील पक्ष्यांच्या विविध प्रजातींविषयी पक्षिमित्र चंद्रकांत शिंगरवाडे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र काळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. वरुड तालुक्यातील असलेल्या पर्यावरणातील विविध घटकांविषयी सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करून विद्यार्थ्यांमधील चिकित्सक वृत्तीला प्रेरणा देण्यात आली. या प्रसंगी हरी सेवा फाउंडेशनचे पदाधिकारी किशोर काळमोरे, महेश बोरकुटे, उमेश कांडलकर, डॉ. आकाश आंडे, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रज्वला साबळे यांनी केले. विद्यार्थ्यांना पक्षांसाठी घरट्याचे वितरण करताना मान्यवर व उपस्थित इतर.