कारच्या परवान्यावर चालवता येणार हलकी ट्रान्सपाेर्ट वाहने:7500 किलोचे वाहन चालवण्यास बंदी नाही – कोर्ट
देशात आता कारच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर (डीएल) हलकी वाहतूक करणारी वाहनेही चालवता येणार आहेत. लाइट मोटार व्हेइकल (एलएमव्ही) परवानाधारक ७५०० किलोपर्यंतचे व्यावसायिक वाहनही चालवू शकतात, असे सुप्रीम कोर्टाने एका निर्णयात म्हटले आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. हृषीकेश रॉय, न्या. पी. एस. नरसिम्हा, न्या. पंकज मित्तल आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या घटनापीठाने बुधवारी यासंदर्भात ७६ याचिकांवर एकमताने निर्णय दिला. विमा कंपन्या परवान्याच्या आधारे दावे नाकारू शकत नाहीत, असेही खंडपीठाने म्हटले आहे. निकाल वाचताना न्या. रॉय म्हणाले, कायद्याचा सामाजिक परिणाम समजून घेणे महत्त्वाचे आहे. अशी वाहने चालवून देशातील कोट्यवधी लोक रोजगार मिळवत आहेत. एलएमव्ही डीएल बाळगणारे चालक जड वाहने चालवत असल्याने जास्त अपघात होतात हे पुराव्यानिशी पटवून देण्यात कंपन्या अपयशी ठरल्या आहेत. वाहन परवाना देण्यापूर्वी चाचणी घेणे अवश्यक
७५०० किलोपर्यंत वैयक्तिक किंवा व्यावसायिक वाहनांमध्ये फरक करणे योग्य ठरणार नाही, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. विशेष परवान्याचा नियम ७५०० किलोपेक्षा जास्त वजनाच्या व्यावसायिक वाहनांसाठी असला पाहिजे. परवाना प्राधिकरणाने वाहन चालवण्याचा परवाना देताना प्रत्येक नियमाचे पालन केले पाहिजे. परवाना देण्यापूर्वी चाचणी घेणे आवश्यक आहे.