क्रेडाईचे कौशल्य विकास अभियान:दरवर्षी १० लाख कामगारांना प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य; गुजरातकडून १०० कोटींचा निधी

क्रेडाई नॅशनलचे उपाध्यक्ष रणजीत नाईकनवरे यांनी बांधकाम क्षेत्रातील महत्त्वपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. मागील दोन वर्षांत तीन लाख कामगारांना प्रशिक्षण देण्यात आले असून, आता दरवर्षी देशभरात दहा लाख कामगारांना प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. गुजरात सरकारने या उपक्रमासाठी १०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. इतर राज्यांमध्येही असाच निधी मिळवून प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जाणार आहेत. क्रेडाई पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत नाईकनवरे यांनी ही माहिती दिली. नाईकनवरे यांनी अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. पश्चिम महाराष्ट्रातील जंगल क्षेत्राचे बांधकामांमुळे होणारे नुकसान रोखण्यासाठी पुनर्वसन कार्यक्रम राबवला जाणार आहे. देशभरातील बांधकाम क्षेत्राचा संपूर्ण डेटा संकलित केला जाणार आहे. परवडणाऱ्या घरांसाठी जीएसटी कौन्सिलची ४५ लाख रुपयांची मर्यादा ७५ लाखांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. बांधकाम नकाशे मंजुरीसाठी ऑनलाइन व्यवस्था करून पारदर्शकता वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रफुल्ल तावरे यांनी सांगितले की, राज्यातील ६० पेक्षा अधिक शहरांमध्ये संस्था कार्यरत आहे. कामगार प्रशिक्षणामुळे बांधकाम क्षेत्रात सुधारणा होईल. ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. क्रेडाई पुणेचे अध्यक्ष मनीष जैन यांनी सांगितले की, भारतातील बांधकाम क्षेत्र विस्तारत असून, सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नवीन बांधकाम विकास आराखडा लवकर मंजूर करण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. पिंपरी चिंचवड मध्ये पर्यावरण क्षेत्र मंजुरी मिळत नसल्याने नवीन बांधकाम यांना परवानगी मिळत नाही. पाणी प्रश्न देखील बांधकाम क्षेत्र यांना जाणवत आहे. वॉटर मीटर हे देखील नागरी क्षेत्रात बसवणे सुरू झाले असून ते योग्य पाऊल आहे. बांधकाम क्षेत्र मध्ये मनुष्यबळ पगार वाढत असले तरी तंत्रद्यान मदत घेऊन किफायतशीर दर ठेवणे प्रयत्न करण्यात येत आहे.

  

Share