क्रिकेटपटू पृथ्वी शॉने मुंबई संघाशी तोडले नाते:आता महाराष्ट्राकडून खेळणार, एमसीएचे अध्यक्ष रोहित पवारांनी केली घोषणा

मुंबईचा आक्रमक टॉप ऑर्डर फलंदाज आणि टीम इंडियाच्या बाहेर असलेला सलामीवीर पृथ्वी शॉने मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) सोबतचे संबंध अधिकृतपणे तोडले आहेत. अलिकडेच, त्याने दुसऱ्या राज्यातून देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी एमसीएकडून एनओसी मागितली होती. एनओसी मिळाल्यानंतर, पृथ्वी शॉ आता आगामी देशांतर्गत हंगामात महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत ऋतुराज गायकवाड, अंकित बावणे, राहुल त्रिपाठी यांच्यासोबत खेळताना दिसणार आहे. पृथ्वी शॉच्या आगमनामुळे महाराष्ट्र संघ आणखी मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही माहिती दिली. यासंदर्भात बोलताना पृथ्वी शॉ म्हणाला, “माझ्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर महाराष्ट्र संघात सामील होणं, मला एक क्रिकेटपटू म्हणून अधिक परिपक्व होण्यास मदत करेल, असं मला वाटतं. मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचा अत्यंत ऋणी आहे. त्यांनी मला अनेक संधी दिल्या आणि कायम पाठिंबा दिला.” तो पुढे म्हणाला, “महाराष्ट्र संघात रुतुराज गायकवाड, अंकित बावणे, राहुल त्रिपाठी, रजनीश गुरबानी आणि मुकेश चौधरीसारख्या प्रतिभावान खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळणार आहे, याचा मला आनंद आहे.” रोहित पवार काय म्हणाले? वनडे, T-20 आणि कसोटी या सर्व प्रकारामध्ये प्रतिनिधित्व केलेला स्टार खेळाडू पृथ्वी शॉ चं MCA च्या संघात सहर्ष स्वागत! ऋतुराज गायकवाड, अंकित बावणे, राहुल त्रिपाठी, मुकेश चौधरी, रजनीश गुरबाणी या अनुभवसंपन्न आणि नवोदित खेळाडूंसोबतच पृथ्वी शॉचीही बॅट तळपताना आता क्रिकेट रसिकांना पहायला मिळणार असून त्यामुळं महाराष्ट्राचा संघही अधिक भक्कम होईल. पृथ्वी शॉने आतापर्यंत भारतीय संघात आणि #IPL मध्येही चमकदार कामगिरी केलीय. त्याचा अनुभव व आक्रमक खेळ नव्या पिढीच्या क्रिकेटपटूंना मार्गदर्शक ठरेल. पृथ्वी शॉ याला महाराष्ट्र संघात सामावून घेण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी आमच्या अपेक्स बॉडी आणि सीएसी कमिटीचे आभार आणि पृथ्वी शॉला पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा! अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे.
अंडर-19 वर्ल्ड कपचा विजेता कर्णधार पृथ्वी शॉने भारतासाठी सर्व तिन्ही टेस्ट, वनडे आणि टी 20 सामन्यांत प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे आणि सामन्याचा प्रवाह बदलण्याच्या क्षमतेमुळे तो आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये कायमच चर्चेत राहिला आहे. विशेष म्हणजे, 2018 मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली भारताने ICC अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत 13 शतके झळकावली असून त्याच्या नावावर 4500 हून अधिक धावा आहेत. विनोद कांबळीशी होऊ लागली तुलना पृथ्वी शॉने 2018 मध्ये अवघ्या 18 व्या वर्षी वेस्ट इंडीजविरुद्ध टेस्टमध्ये पदार्पण करत शतक झळकावले होते. त्यावेळी त्याची तुलना विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागसोबत होऊ लागली होती. मात्र त्यानंतर त्याच्या कारकिर्दीत चढ-उतार सुरू झाले. 2018 नंतर तो फक्त 5 टेस्ट, 6 वनडे आणि 1 टी- 20 सामन्यातच भारताकडून खेळला आहे. त्याच्या शानदार सुरुवातीनंतर लवकरच संघाबाहेर पडल्यामुळे त्याची तुलना माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीशी होऊ लागली आणि म्हटले जाते की, आणखी एक प्रतिभावान खेळाडूचे करियर अनुशासनहीनतेमुळे भरकटले. आयपीएल 2025 मध्येही कोणी घेतले नाही पृथ्वी शॉची कारकीर्द गेल्या वर्षभरात घसरताना दिसली. फिटनेसच्या आधारावर त्याला मुंबई रणजी संघातून वगळण्यात आले. तसेच आयपीएल 2025 च्या मेगा लिलावातही 75 लाख रुपयांचा बेस प्राइस असूनही कोणत्याही संघाने त्याच्यावर बोली लावली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *