शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी एका आरटीओ अधिकाऱ्याला खडेबोल सुनावल्याचे समोर आले आहे. शाळकरी ऑटोला दंड लावल्याने संतोष बांगर आक्रमक झाल्याचे समजते. शाळकरी ऑटोला दंड लावल्याचे समजताच बांगर यांनी ‘अशा प्रकारे दंड ठोठावणार असाल तर मी आरटीओ ऑफिसला कुलूप लावून टाकेन’ अशा शब्दात आरटीओ अधिकाऱ्याला झापल्याचे पाहायला मिळाले. शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका ऑटोचालकाला आरटीओ अधिकाऱ्याने मोठा दंड ठोठावल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारानंतर ऑटोचालकाने हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर आमदार बांगर यांनी आक्रमक होत संबंधित आरटीओ अधिकाऱ्याला फोनवरच चांगलेच झापले. आमदार संतोष बांगर यांनी आरटीओ अधिकाऱ्याला, “अशा प्रकारे दंड ठोठावणार असाल तर मी आरटीओ ऑफिसला कुलूप लावून टाकेन”, असा दम दिला. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकाऱ्यांमधील कामकाजावरून सुरू असलेला वाद चर्चेत आला आहे. आमदार संतोष बांगर हे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर चर्चेत आलेले एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व आहे. शिंदे गटात सर्वात शेवटी सामील झालेल्या आमदारांपैकी ते एक आहेत. विशेष म्हणजे, बंडखोरी सुरू असताना अनेक आमदार शिंदे गटात जात असताना, बांगर यांनी जाहीरपणे आपण उद्धव ठाकरे यांची साथ कधीही सोडणार नाही अशी ग्वाही दिली होती. मात्र, काही दिवसांतच त्यांनी आपला शब्द फिरवला आणि ते शिंदे गटात सामील झाले. मुख्यमंत्रिपदाचा दावा केल्यानंतर जेव्हा विश्वासदर्शक ठरावासाठी विशेष अधिवेशन बोलावले होते, तेव्हा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बांगर हे ठाकरेंच्या बाजूने उभे होते. पण, दुसऱ्याच दिवशी एका रात्रीत त्यांनी आपली निष्ठा बदलली आणि ते शिंदे गटात दाखल झाले. त्यांच्या या भूमिकेमुळे ते नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत.