दर्ग्याच्या पाहणीपूर्वीच हुसैन दलवाईंना पोलिसांनी घेतले ताब्यात:म्हणाले- इथल्या आमदारांना तुम्ही अटक केली पाहिजे, नाशिकच्या सातपीर दर्गा परिसरात पोलिस तैनात

नाशिक येथील काठे गल्लीतील अनधिकृत सातपीर दर्ग्याच्या पाडकामावेळी पोलिसांवर तूफान दगडफेक झाली होती. यात अनेक पोलिस जखमी झाले होते. त्यानंतर येथे तणावपूर्ण शांततेत अतिक्रमण कारवाई करण्यात आली. आज मंगळवारी कॉंग्रेसचे माजी खासदार हुसैन दलवाई नाशिकमध्ये दाखल झाले. दर्ग्यावर केलेल्या अतिक्रमण कारवाईची पाहणी करण्यासाठी ते जात असतानाच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नाशिक पोलिसांनी हुसैन दलवाई यांना ताब्यात घेतले आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. हुसैन दलवाई यांना गंगापूर पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे. यावेळी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना दलवाई यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. मी दंगा करणारा माणूस नाही, जे दंगे करतात त्यांना तुम्ही संरक्षण देतात, असे दलवाई म्हणाले आहेत. इथल्या आमदारांना तुम्ही अटक केली पाहिजे पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर हुसैन दलवाई म्हणाले, पोलिसांचे म्हणणे आहे की, तुम्ही गेल्यानंतर इतर लोकही तिथे जातील. मग त्यांना आडवा. माझा जाण्याचा काय प्रश्न आहे? माझे चारित्र्य सर्वांना माहीत आहे. मी कुठेही दंगे करणारा माणूस नाही. जे दंगे करतात त्यांना तुम्ही संरक्षण देतात. त्यांचे सगळे एकतात. त्यांच्यामुळेच ही गडबड झाली आहे. इथल्या आमदारांना तुम्ही अटक केली पाहिजे. ज्या पद्धतीने त्या बोलतात सगळ्या दर्ग्यांना त्या थडगे म्हणतात, हे चुकीचे आहे. थडगं आणि दर्गा यात फरक आहे. थडगं काढणार आणि हनुमानाचे मंदिर बांधणार, असे म्हणणाऱ्यांना तुम्ही खरे म्हणजे अटक केली पाहिजे. पोलिसांमध्ये हिंमत असेल तर तुम्ही ते करा मला कशाला अटक करताय? असा सवाल दलवाई यांनी केला आहे. पुढे बोलताना हुसैन दलवाई म्हणाले, या परिसरात नेमके काय घडले होते तेच पाहण्यासाठी मी जात होतो. पण, मला तेच पाहू दिले नाही. मी तिथे घोषणाबाजी केली नाही. मी काहीही केले नाही. 350 वर्षांची ती दर्गा होती. ती तुम्ही उद्ध्वस्त करण्याचे कारण काय? ते हिंदू आणि मुसलमानांचे ऐक्य आहे. त्या दर्गेचे दोन ट्रस्ट हिंदू आहेत. तो वाद निर्माण केला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

  

Share