इ-पीक पाहणीसाठी नवीन ॲप:पीक नोंदणीसाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत‎

तालुक्यातील शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम १ डिसेंबरपासून सुरू झाला आहे. शेतकऱ्यांची पीक पाहणी करण्यासाठी यापूर्वी इ-पीक पाहणी मोबाइल ॲप उपलब्ध होते. केंद्राच्या धोरणानुसार आता या ॲपमध्ये काही तांत्रिक सुधारणा करण्यात आल्या आहेत. यामुळे आता इ-पीक पाहणी डीसीएस नवीन रुपात उपलब्ध करून देण्यात आले आहे. यापुढे १०० टक्के इ-पीक पाहणी करण्याचे उद्दिष्ट तालुका महसूल प्रशासनाने ठेवले आहे. शेतकरी स्वतः पिकांची नोंदणी इ – पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे नोंदवत आहेत. आजपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी नोंदवलेली नाही ती तलाठ्यांमार्फत करण्यात येत होती. त्यात दुरुस्ती करून शेतकऱ्यांना हंगामाच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी करण्यासाठी तालुक्यात १५२ गावांतील ६०७२९ खातेदारांसाठी ६२ सहायकांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक गावासाठी एक सहायक उपलब्ध राहणार आहे. शेतकऱ्यांनी १५ जानेवारीपर्यंत इ-पीक पाहणी करावी. शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांनी सहायकांची मदत घेऊन १५ फेब्रुवारीपर्यंत इ-पीक पाहणी पूर्ण करावी. पीकविमा, पीककर्ज’ नैसर्गिक आपत्ती, एमएसपी अंतर्गत पिकांची नोंद या सुविधांचा लाभ घेण्यासाठी डीसीएस मोबाईल ॲपमध्ये नोंद असणे यापुढे आवश्यक राहणार आहे. पीक पाहणी करण्यासाठी निवडलेल्या गट क्रमांकापासून ५० मीटरच्या आतील पिकांचे दोन फोटो घेणे गरजेचे आहे. इ-पीक मुदतीत करा इ-पीक पाहणी नोंदणी केल्यास शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी इ-पीक पाहणी ठराविक मुदतीत करावी. कृषि सहाय्यक, तलाठी व तहसील कार्यालयात संपर्क साधावा. -रोहिदास वारुळे, तहसीलदार, कळवण

  

Share