कर्जतमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची जय्यत तयारी:आमदार रोहित पवार व कुस्ती क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते कर्जतमधील दादा पाटील महाविद्यालयासमोरील मैदानाचे पूजन
प्रतिनिधी |कर्जत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने कर्जत-जामखेड मतदारसंघात २६ ते ३० मार्चदरम्यान प्रथमच ६६ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार रोहित पवार व कुस्ती क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते कर्जतमधील दादा पाटील महाविद्यालयासमोरील मैदानाचे पूजन करण्यात आले. आमदार रोहित पवार मित्र परिवार व अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ यांच्या वतीने ही कुस्ती स्पर्धा होत आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या इतिहासात अभूतपूर्व असा हा कुस्ती महोत्सव ठरावा, यासाठी राजकारण विसरून सर्व जण आपापल्या परीने सहयोग देत आहेत. राज्यातील सुमारे १०० हून अधिक मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. कोणत्याही मल्लावर अन्याय होणार नाही, याची काळजी आयोजकांच्या वतीने घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, कुस्ती महोत्सवादरम्यान संत श्री तुकाराम महाराजांच्या पादुका कर्जत-जामखेड मतदारसंघातील सिद्धटेक या तीर्थक्षेत्रावर येणार आहेत. त्यामुळे कर्जत-जामखेडमध्ये एकाच वेळी भक्ती-शक्तीचा अनोखा संगम घडणार आहे. महाराष्ट्र केसरीची गदा पटकावले सर्व विजेतेही या स्पर्धेला हजेरी लावणार आहेत. तब्बल ४० वर्षांपासून महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष राहिलेले ज्येष्ठ नेते शरद पवार हेही स्पर्धेच्या समारोपाला उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेच्या नियोजनात आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्तम सुविधा, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पंचांची नेमणूक, तसेच गुणवत्तेनुसार विजेता ठरावा, यासाठी कोणताही राजकीय हस्तक्षेप न होण्याची विशेष काळजी घेतली जाणार आहे. तसेच या कुस्ती स्पर्धेत निर्णय घेताना तसुभरही चूक होऊ नये, यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. कुस्तीला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळाव्यात, मल्लांना योग्य प्रशिक्षण व संधी उपलब्ध व्हावी, हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.