गुन्हा दाखल असूनही वाल्मिक कराड खुला फिरतोय:सरपंच हत्येवरून संभाजीराजेंचा संताप, धनंजय मुंडेंना मंत्री न करण्याची अजितदादांकडे मागणी

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली. तसेच खूनाचा तपास पूर्ण होईपर्यंत येथील आमदारांना मंत्रिपद देऊ नये, अशी मागणीही संभाजीराजे यांनी अजित पवारांकडे केली आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात एवढ्या क्रूरपणे हत्या होऊ शकते? यावर विश्वासच बसत नाही, असे म्हणत संताप व्यक्त केला. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा सोमवार 9 डिसेंबर रोजी अपहरण करून खून झाला होता. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि पँथर सेनेचे दीपक केदार यांनी शनिवारी मस्साजोग येथे भेट देऊन देशमुख कुटुंबियांचे सांत्वन केले. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना संभाजीराजे यांनी या प्रकरणावरून संताप व्यक्त केला. काय म्हणाले संभाजीराजे?
शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात इतकी क्रूर हत्या होऊ शकते, यावर विश्वास बसत नाही, असे संभाजीराजे म्हणाले. आपण शिवरायांचे वंशज आहोत, शिवरायांनी सर्व जाती धर्मांतील लोकांना सोबत घेतले. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनीही लक्ष घालावे, अथवा उद्रेक झाला तर आपण जबाबदार नाही, असा इशाराही संभाजीराजे यांनी सरकारला दिला. या प्रकरणाला जातीय रंग नको
संतोष यांनी सर्व समाजासाठी काम केले. दलित लोकांवरील अन्यायाच्या विरोधात लढल्याने त्याचा खून झाला. या प्रकरणाला जातीय रंग नको, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमली जावी, अशी मागणी संभाजीराजे यांनी यावेळी केली. तसेच जिल्ह्यातील आमदारांनी अधिवेशनात हा मुद्दा लावून धरावा, असे आवाहनही त्यांनी केले. गुन्हा दाखल असूनही वाल्मिक कराड खुला फिरतोय
या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले फरार आहे. तो कुठल्या पक्षाचा आहे हे अजित पवारांनी परीक्षण करावे. या प्रकरणातील आरोपी विष्णूचा चाटे याला वाल्मिकी कराड सपोर्ट करतोय. वाल्मीक कराडवर गुन्हा दाखल असून देखील तो खुला फिरत आहे. सरकारला हे कसे जमते? असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला. पोलिसांची भूमिका संशयास्पद
घटनेनंतर केज पोलिसांनी तीन तास विलंब केला. या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटते. त्यामुळे केजच्या पोलिस निरीक्षकांना सहआरोपी केले पाहिजे, अशी आमची मागणी असल्याने संभाजीराजे म्हणाले. पोलिस महासंचालकांशी या प्रकरणी फोनवर चर्चा झाली. पण त्यांनादेखील या प्रश्नाचे उत्तर देता आले नसल्याचे त्यांनी सांगितले. …तोपर्यंत तुमच्या आमदारांना मंत्री करू नका
हे सगळे अजित पवारांच्या पक्षाचे लोक आहेत. देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळत नाही तोपर्यंत तुमच्या मतदारसंघातील आमदारांना मंत्री करू नका, अशी मागणी संभाजीराजे यांनी अजित पवारांकडे केली. ही माझीच नाही तर येथील सगळ्या ग्रामस्थांची भूमिका असल्याचेही ते म्हणाले. अजितदादांनी या ठिकाणी येऊन भेट द्यावी. याबाबत सगळ्या आमदारांनी आवाज उठवावा, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले.

  

Share