रुसू नको ज्ञाना, ये बैस पाटी, घालते तुजला रांगोळी मोठी उदबत्या समई, रांगोळी दाट, नक्षीच्या पाटावर बैसे जग जेठी…. अशी विनवणी करीत कैवल्य साम्राज्य संत ज्ञानेश्वर महाराजांना पालखी सोहळ्यामध्ये दररोज पंचपक्वानांचा महानैवेद्य संस्थानातर्फे दाखविण्यात येतो. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा जिल्ह्यात दाखल झाल्यानंतरच जेवणाचा पहिला विसावा, कारुंडे येथे असतो. सोहळा सकाळी अकरा वाजेदरम्यान विसावाच्या ठिकाणी दाखल झाला. पण, सकाळी आठ वाजल्यापासून त्या परिसरातील एका तंबूमध्ये देवाच्या महानैवेद्याची लगबग सुरु होती. कऱ्हाड (सातारा) येथील सुनंदा कुलकर्णी, प्रतिभा घोडके या भगिनी, त्यांच्या सहकारी सोवळ्या मध्ये नैवेद्याची तयारी सुरु करतात. पालखीच्या तळावर माऊलींच्या महानैवेद्यासाठी संस्थानातर्फे स्वतंत्र तंबूमध्ये व्यवस्था करण्यात येते. असा असतो महानैवेद्य… दररोज महानैवेद्यामध्ये पुरणपोळी, शेवयांची खीर, बेसनाचे लाडूू, गुलाबजाम, बासुंदी, सुधारस, आमरस, चटणी, डाळिंबाची कोशींबीर, डाळिंबाचे दाणे घालून कोशिंबीर, पाकपुऱ्या, श्रीखंड, मुगाच्या डाळीची खिचडी, भजी असा नैवेद्य तयार करण्यात येते. केसरयुक्त पाणी असते व गोविंद विडा असतो. नेवैद्य तयार करून तो चांदीच्या ताटामध्ये वाढण्यात येतो. त्यासोबत पेजसाठीचे चौपाळे असते. त्यामध्ये हळद-कुंकू, अक्षदा, अत्तर, फुलं असतात. नैवेद्य दाखविताना त्यावर तुळशीपत्र ठेवण्यात येते. एकादशीला नैवेद्यात फराळाचे पदार्थ असतात. त्यामध्ये भगर, श्रीखंड, फळं आदी असतात. दुपारी जेवणासाठी पालखी सोहळा थांबतो, त्या ठिकाणी महानैवेद्य दाखविण्यात येतो. नैवेद्य तयार झाल्यानंतर तो नेण्यासाठी सेवेकरी पट्टेवाले येतात. त्यांच्या समवेत पौरोहित्य करणारे गुरुजी असतात. नैवेद्य पालखी तळावर नेल्यानंतर दर्शनबारी थांबविण्यात येते. माऊलींच्या पादुका चांदीच्या पाटावर घेण्यात पादुकांची पूजा करण्यात येते. त्यास अत्तर लावण्या येते. त्यावर फुलं-तुळशीपत्र वाहण्यात येते. त्या पानाच्या भोवती पडदा धरून, माऊलींनी शांतपणे जेवण करावे, अशी प्रार्थना करण्यात येते. “देव जेवले हो देव जेवले, या या डोळ्यांनी मी पाहिले… कटेवरला तो काढून हात, कालवला दहीभात, हळूच भुरके मारीयले, ओरपली याने खीर थोडी, तोंडी लावली कोशिंबीरी, मोर मुरडीचा कानवला, देव जेवले हो देव जवले…” अशी गाणी म्हणण्यात येतात. त्यानंतर पौरोहित्य करणारे गुरुजी आम्हाला तीर्थ देतात. माऊलींचे तीर्थ हेच त्या दिवसातील आम्ही घेतलेला पाण्याचा पहिला घोट असतो. पहाटे स्नान केल्यानंतर संपूर्ण स्वयंपाक पूर्ण करून माऊलींचे जेवण होईपर्यंत अखंड नामस्मरण आम्ही व आमच्या इतर सहकाऱ्यांची मदत होते, असे सुनंदा व प्रतिभा या भगिंनीननी सांगितले.