देवेंद्र फडणवीस सरकारने हनिमून पीरियडमध्ये काय केले?:आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले- ‘कोर्टातून लाडकी बहीण योजना बंद करतील’

कोणताही नवीन मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले शंभर दिवस किंवा तीन महिने हनिमून पीरियड असल्याचे म्हटले जाते. या काळामध्ये मुख्यमंत्री जे काही करतात त्यांच्या कामाचे कौतुक महाराष्ट्रातून होत असते. मात्र या हनिमून पीरियडमध्ये राज्यातील भाजप आणि ‘महाझुटी’ सरकारने काय केले? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. त्यामुळे महाराष्ट्र चाललाय कुठे? याचा विचार करायचा असेल तर गेल्या शंभर दिवसात काय घडले, हे पहावे लागेल, असे देखील ते म्हणाले. गेल्या शंभर दिवसात या सरकारने एकही चांगली योजना आणली नसल्याचा आरोप त्यांनी केला. ठाकरे गटाच्या वतीने नाशिकमध्ये आयोजित पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि महायुती वर निशाणा साधला. ते म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी एकही चांगली योजना या सरकारने आणली नाही. महिलांसाठी एक तरी योजना आणली का? तरुणांसाठी तरी आणली का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तरुण वर्गासाठी, शिक्षण घेणाऱ्या किंवा नोकरी शोधणाऱ्या युवकांसाठी सरकारने एकही योजना आणली नसल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. कोर्टातून लाकडी बहिण योजना बंद करतील लाडकी बहीण योजनेचे काय झाले? असा प्रति प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. या योजनेत ते आता पाचशे रुपयांवर आले आहेत. बहुमत ठासून आल्यानंतरही तुमच्या वचन नाम्यात असलेली एकही गोष्ट प्रत्यक्षात आणली जात नाही. यासाठी एक वेगळा निर्लज्जपणा लागत असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर केली आहे. अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचा दावा केला जात होता. आता त्यात 50 कोटी महिला कमी करण्यात आल्या आहेत. आता त्यांचेच काही लोक कोर्टात जातील आणि कोर्टातून ही योजना बंद करतील, असा दावा देखील त्यांनी केला आहे. राक्षसी सरकार आपल्या डोक्यावर बसले भारतीय जनता पक्षाच्या आशीर्वादाने आणि निवडणूक आयोगाच्या आशीर्वादामुळे हे सरकार आपल्या डोक्यावर बसलेला आहे. त्यांना दुसरा कोणताही आशीर्वाद नसल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. या सरकारच्या पहिल्या शंभर दिवसांमध्येच राज्यात महिलांवर अत्याचार वाढले आहेत. या सरकारमध्ये संवेदनशीलता तर नाहीच मात्र, हे राक्षसी सरकार आपल्या डोक्यावर बसले आहे, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीका केली. बीड प्रकरणात आका कोण? मुख्यमंत्र्यांचे हात का बांधले होते? बीड प्रकरणात प्रमुख आका अद्याप समोर आलेला नाही. बीड प्रकरणात संपूर्ण महाराष्ट्राला आका कोण हे माहिती आहे. मात्र तरी देखील तो अद्याप समोर आणला गेला नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. या प्रकरणात राजीनामा घ्या, आणि कारवाई करा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार देखील करत होते. मात्र, तरी देखील मुख्यमंत्र्यांचे हात का बांधले होते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या राज्यात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हत्या होत असेल आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांना न्याय मिळत नसेल तर इतरांनी करायचे काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. फडणवीस यांच्याकडून न्याय अपेक्षित करणे हाच गुन्हा पहिल्या शंभर दिवसांमध्येच एका मंत्राला राजीनामा द्यावा लागला. ही लोकांची ताकद आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र नेमका चालला कुठे? असा प्रश्न समोर येत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. परभणी प्रकरणात देखील अद्यापही सूर्यवंशी कुटुंबीयांना न्याय मिळाला नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री असलेल्या फडणवीस यांच्याकडून न्याय अपेक्षित करणे हाच आता गुन्हा झाला आहे, असे देखील आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. अद्याप शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली नाही राज्यात सर्वात मोठी फसवणूक ही शेतकरी बांधवांची झाली आहे. आमच्या सरकार येणार आणि आमचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, असे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले होते. मात्र त्यांनी अद्याप शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली नाही, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला. वीज माफी देणार, सातबारा कोरा करणार, असे अनेक आश्वासने त्यांनी दिले होते. मात्र आता फडणवीस यांनी सरकार बसल्यानंतर देखील, 135 आमदार आल्यानंतर देखील, त्यांनी अद्याप शेतकरी कर्जमाफी केली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. फोडा, तोडा आणि आणि राज्य करा, ही इंग्रजांची विचारसरणी होती. तीच विचारसरणी आता भारतीय जनता पक्षाने घेतली असल्याचेही ते म्हणाले.

  

Share