देवेंद्र फडणवीस यांची नारळी सप्ताहाला उपस्थिती:गहिनीनाथ गडावरून केली गोपीनाथ मुंडेंची आठवण; ‘दुष्काळ मुक्तीसाठी घोषणा’

गहिनीनाथ गडाला दत्तक घेण्याची विनंती पंकजा मुंडे यांनी केली आहे. मात्र, मी तेवढा मोठा नाही, माझी तेवढी औकात देखील नाही आणि लायकी देखील नाही. त्याऐवजी गहिनीनाथ गडाने मला दत्तक घ्यावे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गहिनीनाथ गडाच्या विकासाचा मुद्दा मांडला. गहिनीनाथ गडावर आयोजित फिरता नारळी सप्ताहाच्या निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडावर हजेरी लावत आशीर्वाद घेतले. या वेळी ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्व. गोपीनाथ मुंडे यांची देखील आठवण काढली. आमचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे आमचे आणि बीडचे वेगळे नाते निर्माण झाले असल्याचेही ते म्हणाले. बीडमध्ये 1993 पासून सप्ताह सुरू असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. केवळ गडाचाच विकास नाही तर गडावर येणाऱ्या प्रत्येकाचा विकास व्हायला हवा. बीड जिल्हा दुष्काळाच्या छायेत आहे. त्याला बाहेर काढायला हवे, तसेच मराठवाड्याला देखील दुष्काळाच्या बाहेर काढायला हवे. त्यासाठी आपण प्रयत्न सुरू केले असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. आपल्या हक्काचे कृष्णा नदीचा पाणी आष्टी मध्ये आणण्यासाठी निर्णय घेतला आहे. आज ते पाणी आष्टी पर्यंत पोहोचत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. मात्र, केवळ पाणी पोहोचवायचे नाही तर या जिल्ह्याला पाणीदार करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे देखील ते म्हणाले. मे महिन्यात कामाचे टेंडर काढणार संतांच्या आशीर्वादाने मराठवाड्याला कायमचे दुष्काळ मुक्त करण्यासाठी समुद्रात वाहून जाणारे 53 टीएमसी पाणी, हे गोदावरी नदी खोऱ्यात आणण्याला मान्यता देण्यात आली आहे. आता यावर्षी किंवा पुढच्या वर्षी हे काम आम्ही सुरू करणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. 21 टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळायला हवे मात्र केवळ सात टीएमसी पाणी असल्याचे आमच्या लक्षात आले. मात्र, आता कृष्णा कोयनेला पूर येतो, त्या पुराचे पाणी आम्ही वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून या भागात आणण्याचा योजनेला मान्यता दिली आहे. मे महिन्यात यासंदर्भातील कामाचे टेंडर आम्ही काढणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यामुळे नाशिक आणि नगर जिल्ह्यासोबतचा वाद कायमचा मिटवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले. पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला. मात्र पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही. असा संकल्प मी केला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी संत वामनभाऊ सारख्या संतांचा आशीर्वाद पाठीशी असणे महत्त्वाचे आहे. हीच आपली खरी शिदोरी आहे. देश, धर्म, परंपरा आणि संस्कृती जिवंत राहिली पाहिजे. कितीही आक्रमणे झाली, तरी संतांनी त्यांचा मार्ग सोडला नाही. तोच मार्ग समाजाने देखील सोडला नाही. त्यामुळे कितीही दुष्काळ असला तरी आमचे सप्ताह होतात. सुविचार लोकांच्या कानापर्यंत जातात आणि लोक एकत्र येतात. सर्व समाजाचे लोक एकत्रित असतात, कुठलाही भेदभाव वारकरी संप्रदायाने कधीही ठेवला नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. बीड जिल्ह्याला पाणीदार जिल्हा करणार बीड जिल्ह्याला नारळी सप्ताह, अध्यात्म व विचारांची मोठी परंपरा लाभली आहे. संत वामन भाऊ यांनी सुरू केलेली सप्ताहाची परंपरा अखंडपणे ९३ वर्ष सुरू आहे. या परंपरेच्या माध्यमातून समाज घडविण्याचे मोलाचे कार्य होत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. गहिनीनाथ गडाचा विकास करताना बीड जिल्ह्याला पाणीदार जिल्हा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिरूर कासार तालुक्यातील घाटशीळ पारगाव येथे श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या ९३ व्या नारळी सप्ताहासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मुस्लिम समाज बांधव देखील सहभागी फडणवीस पुढे म्हणाले, गहिनीनाथ गडाच्या विकासाचे काम सुरू केले आहे व अजून पुढे विकासाची ही कामे करायची आहेत. संतानी दाखविलेला भक्तीचा मार्ग समाजाने सोडलेला नाही. समाज घडविणाऱ्या या परंपरेत समाजातील सर्व घटकांचा सहभाग दिसून येत आहे. यामध्ये मुस्लिम समाज बांधव देखील सहभागी झाले, याचा आनंद आहे. आमचे नेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्यामुळे बीड जिल्ह्याशी वेगळे नाते निर्माण झाले आहे. आज मला वामनभाऊंच्या या सप्ताहाच्या परंपरेत सहभागी होऊन आशीर्वाद घेता आला याचा मनस्वी आनंद असल्याचे ते म्हणाले. परिसरातील दुष्काळ कायमचा मिटेल गहिनीनाथ गडावर येणाऱ्या प्रत्येक भक्ताची उत्तम व्यवस्था झाली पाहिजे, गडासोबतच या परिसरातील भाविकांच्या सोई सुविधांचा तसेच या परिसराचा देखील विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगून फडणवीस म्हणाले, मराठवाडा व बीड जिल्ह्याला कायमस्वरुपी दुष्काळमुक्त करण्यासाठी शासनाने कृष्णेचे पाणी आष्टीपर्यंत आणले आहे. ते पाणी संपूर्ण बीड जिल्ह्यात पोचविण्याचा आपला प्रण आहे. मराठवाडा व बीड जिल्ह्याला पाणीदार करण्यासाठी ५३ टीएमसी पाणी गोदाखोऱ्यात आणण्याच्या आराखड्याला देखील मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील दुष्काळ कायमचा मिटेल. आजच्या या पिढीने दुष्काळ पहिला, तो पुढच्या पिढीला पाहू देणार नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. बीड जिल्हा नक्कीच सुजलाम, सुफलाम होईल – पंकजा मुंडे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, संत वामनभाऊ, संत भगवान बाबा यांनी या भागातील लोकांना आध्यात्मिक गोडी निर्माण करणारी सप्ताहाची परंपरा सुरू केली, ती अखंडपणे सुरू आहे. गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी तसेच बीड जिल्ह्याच्या सर्वागीण विकासासाठी मुख्यमंत्री महोदय आपल्यासोबत आहेत, त्यामुळे येत्या काळात बीड जिल्हा नक्कीच सुजलाम, सुफलाम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराज यांनी संत वामनभाऊ यांनी ९३ वर्षापूर्वी सुरू केलेल्या अखंड नारळी सप्ताह परंपरेबाबत माहिती दिली.यावेळी बीड, अहिल्यानगर जिल्ह्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  

Share