दिलीप वळसे पाटलांना मंत्रिपद का नाही?:नवीन नेतृत्व महाराष्ट्रात तयार करायचे आहे, सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितले

महाराष्ट्रात महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. मात्र, अनेक आमदार मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याचे देखील समोर आले आहे. तसेच अजित पवारांनी ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांना मंत्रिपद का दिले नाही म्हणून अनेकांना प्रश्न पडला होता. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना तटकरे यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. कुठलाही डाग नसलेला नेता अशी ओळख असलेले दिलीप वळसे पाटील यांना मंत्रिपद का देण्यात आले नाही, असे विचारण्यात आले असता सुनील तटकरे म्हणाले, त्यांच्या ज्येष्ठत्वाचा आदर आम्हाला सगळ्यांनाच आहे. पण शेवटी नवीन नेतृत्व जेव्हा महाराष्ट्रात तयार करायचे असते, आम्हाला सहभागी मंत्र्यांची संख्या मर्यादित आहे. अशावेळी नवीन चेहरा आणले तर त्याचाही उपयोग पक्षाच्या बांधणीसाठी होतो. पुढे बोलताना सुनील तटकरे म्हणाले, दिलीप वळसे पाटलांचा विधिमंडळ कामकाजाचा, मंत्रीपदाचा, विधानसभा अध्यक्ष म्हणून कामकाजाचा, संघटन कौशल्याचा प्रदीर्घ अनुभव उद्याच्या काळात आम्ही नक्कीच अशा पद्धतीने उपयोग करून घेऊ की महाराष्ट्रात आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची प्रभावीपणाची भूमिका राहिलेली पाहायला मिळेल. राष्ट्रीय पातळीवर सुद्धा त्यांनी काम केले आहे. सुनील तटकरे यांना राज्यपाल बनवण्यात येणार असल्याच्या देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. यावर देखील सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सुनील तटकरे म्हणाले, ही चर्चा तथ्यहीन आहे. या संदर्भात कधीही भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाशी आमची चर्चा कधीही झालेली नाही, असे तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

  

Share