दिशा सालियान मृत्यू प्रकरणात नवे वळण आले आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी कुठलाही घातपात नसल्याचे एसआयटीच्या चौकशीत समोर आले आहे. एसआयटीने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात याचा खुलासा करण्यात आला आहे. या प्रकरणातील करण्यात आलेले आरोप हे निराधार असल्याचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे. तपासात काय समोर आले? या प्रकरणातील इमारतीचे सीसीटीव्ही तपासण्यात आले असता त्यात काही आढळून आले नाही. तसेच घटनेच्या रात्री उपस्थित असलेल्या सर्व व्यक्तींचे कॉल रेकॉर्डिंग तपासण्यात आले, त्यातही काही आढळून आले नाही. शवविच्छेदन अहवाल तपासले असता त्यात शारीरिक किंवा लैंगिक अत्याचार झाल्याचे कुठलेही चिन्ह दिसली नाहीत. माझा त्या विषयाशी संबंध नाही – आदित्य ठाकरे विधानभवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधत असताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना दिशा सालियान मृत्यू प्रकरणी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, मी त्यावेळी पण सांगितले होते की ज्या विषयाशी संबंध नाही त्यावर मी बोलत नाही. मी आज देखील तुम्हाला सांगतो, आज देखील माझी भूमिका हीच आहे की ज्या विषयाची माहिती नाही आणि संबंध नाही त्यावर मी कशाला बोलू? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नितेश राणेंनी नाक घासून माफी मागितली पाहिजे – संजय राऊत याच प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, तुमच्याच माध्यमातून सत्य समोर आले आहे. आता काय करणार, सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागायला हवी. त्यानंतर नारायण राणेंचा एक मुलगा आहे मंत्री, एवढा आहे बघा तो, काहीतरी बडबडत असतो नेपाळ्या सारखा. त्याने माफी मागायला पाहिजे. नाक घासून. यंत्रणेचा गैरवापर करता, पण लक्षात ठेवा डाव उलटला जाईल केव्हातरी तुमच्यावर, तुम्हाला सुद्धा यातूनच जावे लागेल. उद्धव ठाकरे सरकारने पुरावे का नष्ट केले? – राम कदम शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली असली तरी भाजपच्या नेत्यांचा या निर्णयावर आक्षेप घेतल्याचे दिसत आहे. भाजपचे नेते राम कदम दिशा सालियान मृत्यू प्रकरणी बोलताना म्हणाले, माझी मागणी आहे की तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने पुरावे का नष्ट केले, कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला? जारी कोर्टात न्याय मिळाला नाही, ईश्वराच्या कोर्टात न्याय आहे. तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने हात जोडून दिशा सालियान परिवाराची माफी मागितली पाहिजे.