जिल्ह्यात बंडेश्वर भद्रा हनुमान मंदिरासह चार ठिकाणी केले सामूहिक गदा पूजन

अयोध्येत स्थापन झालेले श्रीराम मंदिर ही एकप्रकारे रामराज्याची सुरुवात असून, आता रामराज्य सर्वत्र स्थापन व्हावे. हिंदू समाजातील शौर्य जागृत होण्यासाठी हनुमान जयंतीच्या निमित्ताने हिंदू जनजागृती समिती, समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि भाविकांच्या सहभागाने देशभरात शेकडो ठिकाणी सामूहिक गदापूजन करण्यात आले. जिल्ह्यात ५ ठिकाणी गदापूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यात विशेषत: युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या कार्यक्रमांची सुरुवात शंखनादाने झाली. त्यानंतर सामूहिक प्रार्थना, गदापूजन विधी, श्री हनुमानाची आरती, मारुती स्तोत्र पठण केल्यानंतर श्री हनुमते नम: हा सामूहिक नामजप करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. हा सामूहिक गदापूजन कार्यक्रम बंडेश्वर भद्रा हनुमान मंदिर, कोंडेश्वर रस्ता सह श्री लकडोबा हनुमान मंदिर, हनुमान नगर, हनुमान मंदिर विजय नगर, मारुती संस्थान वाकी रायपूर, हनुमान मंदिर चांगापूर येथे घेण्यात आला. बंडेश्वर भद्रा हनुमान मंदिर येथे गदा पूजन संत बंडोजी महाराजांच्या हस्ते झाले. या वेळी मंदिराचे विश्वस्त पुरुषोत्तम गावंडे, दादाराव धोटे, दिनेश सोनोने, दिलीप निंभोरकर, हिंदू जनजागृती समितीचे नीलेश टवलारे, अविनाश बोडखेसह ३५ ते ४० भाविक उपस्थित होते. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने देशभरात गेली ३ वर्षे सामूहिक गदा पूजन कार्यक्रम यशस्वीपणे घेण्यात येत आहेत.

  

Share