दिव्य मराठी विशेष:आसाम – 15 जिल्ह्यांत नदीकाठावरील गावांत क्लिनिक ऑन बोट, आतापर्यंत 40 लाख लोकांवर झाले उपचार!

अासाम व बांगलादेशच्या तळ भागात दरवर्षी लाखो लोक पुरामुळे विस्थापित होतात. आरोग्य समस्या गंभीर होतात. यातून संसर्गजन्य आजार फैलावतात. अशा स्थितीत आरोग्यसेवा पोहोचवणाऱ्या बोटी जीवनदायी ठरल्या आहेत. आसामच्या १५ जिल्ह्यांत बोट क्लिनिक प्रकल्प चालवले जात आहेत. अलीकडेच दरांग जिल्ह्यात त्याचा प्रारंभ झाला. बोट क्लिनिकद्वारे आतापर्यंत ४० लाख लोकांना सेवा मिळाली. प्रकल्पापूर्वी आसाममध्ये प्रती लाख ४८० एवढा माता मृत्यूदर होता. तो आता १९५ झाला आहे. पहिल्यांदाच डॉक्टर पाहिले जोरहाट बोट क्लिनिकचे आरोग्य अधिकारी डॉ. आरोन मोमीन यांनी एक रंजक अनुभव सांगितला. एका शिबिरात माजुलीहून आलेले वृद्ध आमचे काम पाहत होते. त्यांना उपचारासाठी विचारणा केली तेव्हा ते हसले आणि म्हणाले, मी ठीक आहे. पुन्हा विचारले, मग तुम्ही येथे का आला आहात? त्यावर ते म्हणाले, मी कधी डॉॅक्टर कसे दिसतात हे पाहिलेले नव्हते. पाण्यावर तरंगणारे आशेचे किरण..
आसामचे बोट क्लिनिक बेट क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या लाखो लोकांसाठी आशेचा किरण आहेत. बोटीत प्रयोगशाळा, आेपीडी, फार्मसी इत्यादी सुविधा आहेत. दोन डॉक्टर व १३ स्टाफ प्रत्येक बोट क्लिनिकमध्ये १५ सदस्य असतात. त्यात २ डाॅक्टर, २ नर्स व एक फार्मासिस्ट, एक लॅब तंत्रज्ञ, एक कम्युनिटी वर्कर व ४ बोट कर्मचारी असतात. ही टीम मुख्यत: गरोदर महिला, मुलांवर केंद्रित आरोग्य सेवा देते. प्रत्येक क्लिनिकमध्ये एक बेसिक ऑपरेशन थिएटर असते. ही टीम महिलांना रुग्णालयात रेफर करण्याचे काम करते. अशी सुचली कल्पना सेंटर फॉर नॉर्थ ईस्ट स्टडीजचे संस्थापक संजय हजारिका व जान्हू बरुआ २००४-५ मध्ये बह्मपुत्रा नदीवर माहितीपट तयार करत होते. यादरम्यान एका महिलेस प्रसूतीसाठी रुग्णालयात पाठवू न शकल्याने तिचा मृत्यू झाल्याचे त्यांनी पाहिले. त्यानंतर हजारिका यांना बोट क्लिनिकची कल्पना सुचली. युनिसेफ व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनने प्रकल्पास सहकार्य केले. ही सेवा १५ जिल्ह्यांत आहे.

Share