दिव्य मराठी विशेष:घराघरांत तुळशी विवाहाची लगबग, बाजारात ज्वारीच्या झोपडीसह बोरे, आवळे खरेदीला वेग

ग्रामीण तसेच शहरी भागात तुळशी विवाहाची परंपरा आजही भक्तिभावाने जोपासली जात आहे. मंगळवारी दि. १२ नोव्हेंबरपासून तुळशी विवाहाला सुरुवात होत असून घरोघरी शुभमंगल सावधान आणि मंगलाष्टकांचे सुरात तुळशी विवाहाचा सोहळा साजरा होणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी शहरात ठिकठिकाणी पूजा साहित्याची दुकाने सजली आहेत. त्यासाठी लागणारी ज्वारीची खोपटी, ऊस, बोर, भाजी, आवळा, लाह्या, प्रसाद आदी पूजा साहित्य घेण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू असल्याचे चित्र शहरात पहायला मिळत आहे. बाभुळगाव शहरात ठिकठिकाणी पूजा साहित्याची दुकाने सजली आहेत. दिवाळी संपली की कार्तिकी एकादशीनंतर सर्वांना वेध लागतात ते तुळशीच्या लग्नाचे. तुळशी विवाह हा घरातील लग्नसोहळाच असतो. पौराणिक कथेनुसार, कार्तिक महिन्यात भगवान विष्णूचे शाळिग्राम स्वरूप आणि माता तुळशीचा विवाह करण्याची प्रथा आहे. एकादशी व द्वादशीला प्रामुख्याने हा विधी करतात, परंतु काही ठिकाणी कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह लावण्याची प्रथा आहे. पाच दिवस चालणाऱ्या तुळशी विवाहासाठी लागणाऱ्या पूजा साहित्याच्या खरेदी करिता बाजारपेठेमध्ये गर्दी होत आहे. महिला वर्ग तुळशी वृंदावन सजविण्यात, रंगवण्यात व्यस्त आहेत. शहरातील भारतमाता चौक, वस्ती स्थानक,बस स्थानक बाजार,मुख्य बाजार ओळ भागात विक्रेत्यांनी थाटलेल्या पुजा साहित्याच्या दुकानांमध्ये आबालवृद्धांची गर्दी दिसून येत आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात लहान-मोठ्या झेंडूच्या फुलांची आवक झाली. उर्वरित, पान ४ तुळशी विवाहासाठी पाटावर आसन टाकून तुळस आणि शाळीग्राम मूर्तीची मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. पाटाभोवती ऊस किंवा केळीच्या पानाचा मंडप सजवून कलश ठेवला जातो. सर्व प्रथम कलश आणि गौरी गणेशाची पुजा करावी. धुप दिवा, वस्त्र माळा फुले अर्पण करावी. तुळशीला शृंगार आणि लाल ओढणी अर्पण केली जाते. असे केल्याने सुखी वैवाहिक जीवनाचा आशिर्वाद मिळतो. त्यानंतर तुळशी मंगलाष्टके पठण झाल्यावर विष्णू आणि तुळशीची आरती केली जाते.

  

Share