दिव्य मराठी अपडेट्स:राज्यात पुढील तीन दिवस किमान सरासरी तापमानात 1 ते 3 अंशांनी वाढणार; थंडी कमी, ढगांची गर्दी

नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स राज्यात पुढील 3 दिवस थंडी कमी, ढगांची गर्दी नाशिक – राज्यात थंडीची लाट काही प्रमाणात कमी झाली. त्यामुळे आगामी तीन दिवस किमान सरासरी तापमानात 1 ते 3 अंशांनी वाढ हाेणार असून उबदारपणा जाणवणार आहे. मध्य महाराष्ट्रात दुपारी वातावरण अंशत: ढगाळ राहणार असले तरी पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरावर ठळक हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र स्थित असून ते पुढील बारा तासांत तामिळनाडूसह आंध्र प्रदेशाकडे सरकण्याची शक्यता आहे. औसा तालुक्यात अनेक‎ठिकाणी भूगर्भातून आवाज‎ लातूर – औसा तालुक्यातील गुबाळ, नांदुर्गा‎परिसरात गुरुवारी भूगर्भातून आवाज‎झाला . यामुळे नागरिकांत भीतीचे‎वातावरण निर्माण झाले आहे. नवी‎दिल्ली येथील राष्ट्रीय भूकंप मापन‎केंद्राकडे चौकशी करण्यात आली‎आहे. त्यानुसार या परिसरात‎भूकंपाची कोणतीही नोंद झालेली‎नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरू‎नये, असे आवाहन लातूर जिल्हा‎आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणमार्फत‎करण्यात आले आहे.‎ औसा तालुक्यातील गुबाळसह, मंगरुळ, नांदु‎र्गा, हसलगण, मातोळा, लोहारा-‎उमरगा तालुक्यातील सास्तुर‎माकणीसह परिसरात सुमारे गुरुवारी‎दुपारी 12.25 वाजता मोठा आवाज‎आला. त्यामुळे या परिसरातील‎नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण‎झाले आहे. या आवाजाने 30 सप्टेंबर‎1993 च्या भूकंपाच्या आठवणी जाग्या‎झाल्या . गुबाळ, नांदुर्गा परिसरात‎भूकंपाची नोंद झालेली नाही.‎ आ. मोहिते पाटील यांना आणखी एक नोटीस सोलापूर – भाजपमध्ये असूनही आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा, माळशिरस विधानसभेला शरद पवार गटाचा खुलेआम प्रचार केला. भाजप कार्यकर्त्यांना धमकावले. मारहाणही केली. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टीची प्रक्रिया भाजपने सुरू केली आहे. त्यांना आठ दिवसांच्या मुदतीची नोटीस दोन दिवसांपूर्वी बजावण्यात आली आहे. आता शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालकपद का रद्द करू नये, अशी नाेटीस बजावली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कलम 88 च्या कारवाईत मोहिते पाटील यांनाही जबाबदार धरण्यात आले आहे. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेऊन प्रादेशिक सहसंचालक (साखर) प्रकाश आष्टेकर यांनी ही नोटीस दिली आहे. खासदार शरद पवार उद्या परभणी,‎मस्साजोगला भेट देऊन माहिती घेणार‎ बीड – खा. शरद पवार हे शनिवारी (दि. 21) सकाळी‎9.30 ते 10 वाजेच्या दरम्यान मस्साजोग येथे सरपंच संतोष‎‎देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट‎‎घेऊन संवाद साधणार आहेत. ते‎‎हेलिकॉप्टरने येणार असून,‎‎गावापासून दोन ते अडीच किमी‎‎अंतरावर हेलिपॅड तयार करण्यात‎‎आले आहे. तसेच परभणीतही ते भेट‎देणार आहे. मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांचे ते‎सांत्वन करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.‎ कांदा 7 दिवसांत 3600 वरून आला 1800 रु.वर लासलगाव – येथील बाजार समितीत बुधवारच्या तुलनेत गुरुवारी सकाळच्या सत्रात कांद्याच्या दरात प्रति क्विंटल सुमारे 300 रुपयांनी घसरण झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडत आपला रोष व्यक्त केला. याच कांद्याला 12 डिसेंबर राेजी 3600 रुपये सरासरी भाव मिळाला हाेता. म्हणजेच अवघ्या सात दिवसांत दर 50 टक्के घसरले असून शेतकऱ्यांना प्रतिक्विंटलमागे 1800 रुपये इतके नुकसान सोसावे लागत आहे. दर कोसळत असल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बाजार समितीतील लिलाव बंद पाडून संताप व्यक्त केला. मुंबई बोट दुर्घटनेत मृतांचा आकडा 14 वर, अजून एक जण बेपत्ताच मुंबई – मुंबईच्या समुद्रात नीलकमल या प्रवासी बोट दुर्घटनेत 14 जणांनी आपले प्राण गमावले आहेत, तर 1 जण बेपत्ता आहे. गुरुवारी शोधमोहीम सुरूच होती. मात्र, बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबल्याने लाइफ जॅकेटही संपले होते. लाइफ जॅकेट न मिळाल्याने या प्रवाशांना जीव गमवावा लागल्याची माहिती समोर आली आहे. नीलकमल ही बोट प्रवाशांना घेऊन जात असतानाच नौदलाच्या बोटीची धडक बसून अपघात घडला. आता विरोधी पक्षनेता ठरण्याची शक्यता कमी नागपूर – महायुती सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन बिनखात्यांचे मंत्री आणि विरोधी पक्षनेता तसेच काँग्रेस गट नेत्याशिवायच संपणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. मविआकडून गुरुवारी रात्री उशिरापर्यंत विरोधी पक्षनेता म्हणून कोणाच्या नावाचा प्रस्ताव विधासभा अध्यक्षांकडे सादर झाला नव्हता. दुसरीकडे काँग्रेसचेसुद्धा गटनेत्याच्या नावावर अद्याप एकमत झालेले नाही. नाना पटोलेंनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सोडून विधिमंडळातील काँग्रेस गटनेतेपद मिळवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले. त्याला विजय वडेट्टीवार यांनी कडाडून विरोध सुरू केला. हा वाद काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यामार्फत दिल्लीश्वर राहुल गांधींपुढे गेल्याचे सूत्रांनी सांगितले. मुंबई बोट दुर्घटनेवर अधिवेशनात आज चर्चा नागपूर – नवी मुंबईच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी मुंबई बोट अपघाताविषयी औचित्याच्या मुद्द्याद्वारे अधिवेशनात लक्ष वेधले. यावर अध्यक्षांनी सभागृहाची वेळ संपण्यापूर्वी सरकारने यावर निवेदन करण्याचे निर्देश देतानाच उद्या शुक्रवारी चर्चा घेणार असल्याचे सांगितले. मंदा म्हात्रे बोलत असताना शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत मुंबईतील धरणाचा मुद्दा मांडला. त्यावर सभागृहाचे कामकाज नियमाबाहेर होत असेल तर हरकतीचा मुद्दा उपस्थित करता येतो, असे अध्यक्षांनी स्पष्ट केले. त्यावर नियम 50 नुसार अध्यक्षांना अधिकार असून त्यांनी निर्देश दिल्यानंतर सदस्यांना बोलता येत नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्षात आणून दिले. यावर अध्यक्षांनी “पुस्तिका नीट वाचा, नियम कोणते, कधी वापरायचे याविषयी माहिती घ्या आणि मग बोला’ असे सुनील प्रभू यांना सांगितले. नाना पटोले यांनी पाॅइंट आॅफ प्रोसिजरप्रमाणे दिवसाच्या कामकाजात स्थगनादेशाच्या सूचनांचा अंतर्भाव का करण्यात आला नाही, असा मुद्दा उपस्थित केला. आदिवासींना धर्मांतरासाठी आमिष; 5 जणांवर गुन्हा नांदेड – किनवट तालुक्यातील 400 ते 500 गोरगरीब आदिवासींना वेगवेगळी आमिषे दाखवून त्यांचे धर्मांतर करण्याचा ख्रिस्ती मिशनऱ्यांचा डाव बुधवारी हिंदुत्ववादी संघटनांनी उधळून लावला. याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेऊन रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी ख्रिस्ती धर्मगुरू कालेब उडकुडा आत्राम (रा.गोकुंदा, किनवट), राजेंद्र तारेकर, प्रवीण पाटणकर (दोघे रा. यवतमाळ), सायना चन्नया दलू (रा. आडेली, ता.जि. निर्मल, तेलगंण), धर्मगुरू आनंद मदोरा (रा. निर्मल, तेलगंण) यांच्यावर गुन्हा दाखल केला. स्वकेंद्रित लोकांमुळे देशाची लोकसंख्या कमी होत आहे : सरसंघचालक भागवत पुणे – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी स्वकेंद्रित लोकांना इशारा दिला आहे. त्यांनी लोकसंख्या घटण्यामागे अशा लोकांना जबाबदार धरले आहे. ते म्हणाले, ‘जे लोक फक्त स्वतःचा विचार करतात त्यांना कुटुंब निर्माण करायचे नसते. त्यांना वाटते लग्न का करावे, कशाला कुणाचे गुलाम व्हावे? या विचारसरणीमुळे देशाची लोकसंख्या कमी होत आहे.’ गुरुवारी पुण्यातील हिंदू सेवा महोत्सवाच्या उद्घाटन सत्रात भागवत बोलत होते. ते म्हणाले, करिअरही महत्त्वाचे आहे, मात्र केवळ स्वत:चा विचार करू नये. केवळ वैयक्तिक फायद्याचा विचार न करता समाजाच्या भल्यासाठी कुटुंब निर्माण करण्यावर भर द्यावा,’ असे आवाहन त्यांनी केले. महाबळेश्वरच्या लॉडविक पॉइंटवरून उडी मारून हॉटेल बुकिंग एजंटची आत्महत्या सातारा – महाबळेश्वरच्या लॉडविक पॉइंटवरील कड्यावरून हॉटेल बुकिंग एजंटने पाचशे फूट खोल दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. संजय वेलजी रुघानी (52, मूळ रा. शांतीनगर, मीरा रोड, मुंबई, सध्या रा. पाचगणी), असे मृताचे नाव आहे. महाबळेश्वर आणि पाचगणीत ते हॉटेल बुकिंग एजंट म्हणून काम करत होते. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समोर आले नाही. याप्रकरणी तपास सुरू आहे. आयआरएस अधिकाऱ्यांचा कारभार सिब्झने काढला मुंबई – सांताक्रुझ इलेक्ट्राॅनिक्स एक्स्पोर्ट प्रोसेसिंग झोन (सिब्झ) मध्ये कार्यरत महसूल केडरच्या 2 आयआरएस अधिकाऱ्यांसह एकूण 7 सिब्झ अधिकाऱ्यांवर मंगळवारी सीबीआयने धाड टाकून कारवाई केली होती. यामध्ये सहविकास आयुक्त सीपीएस चौहान यांच्याकडून 40 कोटी रुपयांच्या 25 मालमत्तांची कागदपत्रेही जप्त केली होती. त्याप्रमाणेच उपविकास आयुक्त प्रसाद वरवंटकर आणि इतर अधिकाऱ्यांच्या घरून रोख जप्त करण्यात आली. या अधिकाऱ्यांना बुधवारी जामीन मंजूर झाला असून सिब्झचे आयुक्त ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडून सर्व अधिकाऱ्यांचा कारभार काढून घेण्यात आला आहे. या प्रकरणात सीबीआयच्या कारवाईनंतर आरोपी असलेल्या दोन आयआरएस अधिकाऱ्यांसह एकूण 7 जण सीबीआयच्या कारवाईनंतर 48 तास तुरुंगात असल्यास या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली असती. मात्र, त्यांना बुधवारी जामीन मिळाला आहे. त्यांचे मोबाइल अद्याप सीबीआय अधिकाऱ्यांकडे जप्त असल्याने सध्या तरी त्यांना सीबीआय चौकशी पूर्ण होऊन रिपोर्ट येईपर्यंत कोणतेही दैनंदिन कामकाज देण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी सिब्झ आयुक्तांकडून मिनिस्ट्री आॅफ काॅमर्स अँड इंडस्ट्री यांना स्टेटस रिपोर्ट पाठवण्यात येणार आहे. सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनमध्ये असलेल्या गाइडलाइन्सनुसार जी कारवाई करायला पाहिजे, त्यावर मार्गदर्शन मागण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले आहे.

  

Share