डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण:आत्महत्येला प्रवृत्त केल्या प्रकरणी महिलेवर गुन्हा; पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतल्याची माहिती

सोलापूर शहरातील प्रसिद्ध मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी डॉ. वळसंगकर यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. या चिट्टी मध्ये त्यांनी एका महिलेचे नाव लिहिले असून या महिलेमुळेच आपण आत्महत्या करत असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. त्यामुळे आता रात्री उशिरा या प्रकरणी या महिले विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेला रात्रीच पोलिसांनी ताब्यात देखील घेतले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रसिद्ध मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्येच प्रशासकीय अधिकारी म्हणून ही महिला काम करते. मनीषा मुसळे – माने असे या महिलेचे नाव आहे. या महिलेमुळेच आपण आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख वळसंगकर यांनी आपल्या चिठ्ठी मध्ये केला आहे. या सर्व घटना घडामोडीमुळे आता एकच खळबळ मिळाली आहे. हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी हंबरडा फोडला मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधी होत असताना एसपी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी एकच हंबरडा फोडला. अंत्यविधीसाठी शहरातील इंडियन मेडिकल असोसिएशन, निमा व होमिओपॅथी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. डॉ. वळसंगकर यांनी शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास सात रस्ता परिसरातील त्यांच्या राहत्या घरातील बेडरूममध्ये डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. मेंदू व मज्जा संस्थेवरील उपचारांसाठी प्रसिद्ध डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार झाले. उपस्थितांनी त्यांना साश्रू नयनांनी निरोप दिला. यावेळी एसपीआयएन हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना दु:ख आवरता आले नाही. काहींनी हंबरडाच फोडला होता. मोदीखाना स्मशानभूमीत इंडियन मेडीकल असोसिएशन, निमा व होमिओपॅथी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह समाजातील विविध स्तरातील मान्यवरांची उपस्थिती होती. मेंदू व मज्जा संस्थेवरील उपचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या ६९ वर्षीय डॉ. वळसंगकरांनी शुक्रवारी राहत्या घरात आत्महत्या केली होती. रात्री साडेआठच्या सुमारास बेडरूममध्ये त्यांनी डोक्यात गोळी झाडून घेतली. डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचे निष्पन्न शवविच्छेदन करण्यासाठी शनिवारी पहाटेच्या सुमारास पार्थिव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. सिव्हिलच्या न्याय वैद्यक शास्त्र विभागाच्या टीमकडून त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याच्या प्राथमिक अहवालातही डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी माहिती दिली. शवविच्छेदन दुपारी एक वाजता झाल्यानंतर पार्थिव सात रस्ता येथील घरी आणण्यात आले. तेथे दुपारी चारपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. अनेक मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे शेवटचे दर्शन घेतले.

  

Share