दुधाच्या दरात आजपासून दोन रुपयांची वाढ:आता गाईचे दूध प्रतिलिटर 58 रुपये तर म्हशीचे दूध प्रति लिटर 74 रुपयाला मिळणार
राज्यातील दुधाच्या दारात आजपासून दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आज सर्वसामान्य नागरिकांना दूध दरात दोन रुपये अधिकचे द्यावे लागणार आहे. त्यामुळे आता गाईचे दूध प्रतिलिटर 58 रुपये तर म्हशीचे दूध प्रति लिटर 74 रुपयाला मिळणार आहे. पुण्यात कात्रज दूध संघाच्या मुख्यालयात झालेल्या सहकारी आणि खासगी दूध संघाच्या शिखर संस्था असलेल्या दूध उत्पादक आणि कल्याणकारी संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. दूध संघाच्या या निर्णयामुळे पुणे आणि मुंबई परिसरातील दुधाच्या दरात वाढ झाली आहे. बाकी इतर राज्यात देखील हळूहळू ही दरवाढ दिसून येईल. या निर्णयानुसार आजपासून दुधाच्या किमती दोन रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. दूध संघटनांनी सर्वांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय सर्वसामान्य व्यक्तींच्या खिशाला कात्री लावणारा आहे, असे मत ग्राहकांनी व्यक्त केले. दुधाचे दर आम्हाला परवडणारे नाहीत, याचा सर्वांनी विचार करायला हवा, असे देखील काही ग्राहक म्हणत आहेत. हे दर सर्वच ठिकाणी लागू होतील सध्याची महागाई पाहता दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून दुधाच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दूध उत्पादक आणि कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी दिली आहे. या संदर्भात एकमताने घेण्यात आलेल्या निर्णयानुसार दुधाच्या दरात दोन रुपये प्रति लिटर मध्ये वाढ करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व सहकारी आणि खासगी दूध उत्पादक संस्थांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे दर सर्वच ठिकाणी लागू होतील, असे देखील ते म्हणाले. भेसळखोरांवर कडक कारवाई करण्याची एकमुखी मागणी यावेळी राज्यात भेसळयुक्त पनीरची विक्री होत असल्याबद्दल देखील चर्चा झाली. याबाबत भेसळखोरांवर कडक कारवाई करण्याची एकमुखी मागणी या बैठकीत दूध संघाच्या प्रतिनिधींनी केली आहे. राज्यात दुधाचे संकलन आता सकाळ आणि संध्याकाळ असे दोन वेळा करण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार आता शेतकऱ्यांकडून दोन वेळा दूध संकलन होणार आहे. मात्र दुसरीकडे भेसळयुक्त पनीर संदर्भात महासंघाने आक्रमक भूमिका घेत यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.