उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधुंच्या विजयी मेळाव्यावर प्रतिक्रिया देताना या सोहळ्यावर टीकास्त्र सोडले. राज ठाकरे यांच्या भाषणातून मराठी भाषेबाबतची तळमळ दिसली, पण उद्धव ठाकरे यांच्या भाषणात मात्र केवळ सत्ता, खुर्ची आणि स्वार्थाची मळमळ होती, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. तसेच या मेळाव्यातून मराठी माणसाचा अपेक्षाभंग झाला असल्याचे ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी आजच्या मराठी विजयी मेळाव्यात भाषण करताना पुष्पा स्टाईलमध्ये उठेगा नहीं साला म्हणज एकनाथ शिंदेवर टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना, अब उठेगा नहीं साला, हा डायलॉग उद्धव ठाकरेंना शोभून दिसतो, असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला. तीन वर्षांपूर्वी दाढीवरून अर्धाच हात फिरवल्याने ते आडवे झाले, अजूनही सावरले नाहीत. आता कुणाचा तरी हात पकडून उठण्याचा प्रयत्न करत आहेत. पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर काय झाले असते, याचा विचार त्यांनी करावा, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. फक्त तोंडाच्या वाफा सोडून होत नाही, त्यासाठी मनगटात जोर लागतो, असेही शिंदे म्हणाले. मराठीसाठी एकाची तळमळ, दुसऱ्याची सत्तेसाठी मळमळ एकाने मराठीबद्दल असलेली तळमळ बोलून दाखवली. दुसऱ्याने सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी असलेली मळमळ बोलून दाखवली. झेंडा नाही, अजेंडा नाही असे काही लोक म्हणत होते. पण एका वक्त्याने ते पथ्य पाळले, मात्र दुसऱ्याने स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा रंग शारदेच्या भाषणात निवडणुकीच्या भाषणाप्रमाणे बोलून दाखवला, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देणाऱ्यालाही सोडले नाही मराठीबाबत बोलायचे झाले, तर त्यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्यगीत म्हटले, यासाठी त्यांचे अभिनंदन. पण महाराष्ट्राच्या राज्यगीताला मी मुख्यमंत्री असताना मान्यता दिली आणि ते राज्यगीत सुरू केले. मी मुख्यमंत्री असताना, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आमच्या टीमने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होकार देत तत्काळ मान्यता दिली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणाऱ्या मोदींनाही त्यांनी सोडले नाही. हे दुर्दैवी आहे. यातून त्यांची वृत्ती, त्यांची पोटदुखी दिसून आली. त्यांची लाचारी दिसून आली, असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला. मी त्यांच्या टीकेला उत्तर देत नाही राज ठाकरे यांच्या भाषणात मराठी माणसासाठी असलेली तळमळ दिसली. तर उद्धव ठाकरे यांच्या भाषणात सत्ता आणि खुर्चीसाठीची मळमळ दिसली, अशी टीका शिंदे यांनी केली. उद्धव ठाकरे माझ्यावर सातत्याने टीका करत असतात. पण मी त्यांच्या टीकेला उत्तर देत नाही. मी कामातून उत्तर दिले. त्यामुळेच मी मुख्यमंत्री झालो. अडीच वर्षांनी झालेल्या निवडणुकीतही आमचा मोठा विजय झाला, असे एकनाथ शिंदे म्हणाले. मराठी माणूस मुंबईबाहेर का फेकला गेला? मराठी माणूस मुंबईच्या बाहेर का फेकला गेला? मराठी टक्का कमी का होत गेला? वसई, विरार, नालासोपारा, बदलापूर, अंबरनाथपर्यंत मराठी माणूस का गेला? याचे उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. मराठी माणसांचा अपेक्षाभंग झाला ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत प्रश्न विचारल्यावर लोकशाहीमध्ये कोणालाही कोणासोबतही युती आणि आघाडी करण्याचा अधिकार आहे. निवडणुका जशा जवळ येतील, तशा अनेक घटना दिसतील. त्यामुळे मी सर्वांनाच शुभेच्छा दिल्या आहेत, असे एकनाथ शिंदे म्हणाले. राज ठाकरे यांनी मराठीबद्दलची तळमळ बोलून दाखवली. उद्धव ठाकरे यांनी स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा बोलून दाखवला. त्यामुळे पोटातील ओठावर आले. मराठी माणसांचा अपेक्षाभंग झाला आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.