एकनाथ शिंदे कोणत्या पदावर याला महत्त्व नाही, ते आता लोकनेते:शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांचा दावा; संजय राऊतांवरही टीका

भाजपच्या आमदारांच्या रेट्यामुळे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आहेत. मात्र, एकनाथ शिंदे हे आता कोणत्या खुर्च्यावर आहे त्याला इतिहासात महत्त्व राहिलेले नाही. जनतेच्या मनावर राज्य करणारे ते लोकनेते झाले असल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबाबू पाटील यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले आहे. या पार्श्वभूमीवर शहाजीबाबू पाटील यांनी केलेले हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे पुन्हा उपमुख्यमंत्री पद स्वीकारतील याबाबत शाशंकता व्यक्त केली जात होती. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास तयार नसल्याच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या. मात्र, अखेर शपथविधीच्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यामुळे या सर्व घडामोडी बाबत राज्यात चर्चा सुरू आहे. यातच शहाजीबापू पाटील यांनी एकनाथ शिंदे हे आता लोकनेते असल्याचा दावा केला आहे. शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर देखील पलटवार केला आहे. संजय राऊत यांचे घर भूईसपाट झालेले आहे. त्यातील पत्र, विटा जे काही चांगले असतील, तर ते गोळा करा आणि तुमची झोपडी बांधा, अशा शब्दात त्यांनी संजय राऊत यांना खोचक सल्ला दिला आहे. संजय राऊतांनी शिवसेनेचे तुकडे करून टाकले आहेत. आता उरली सूरली ठाकरेंच्या शिवसेनेचे वाटोळ केल्याशिवाय ते गप्प बसत नाही, असे देखील शहाजीबापू पाटील यांनी म्हटले आहे. या माध्यमातून शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. बॅलेट पेपर मतदान घेतल्यानंतर मतमोजणीच्या दिवशी भाजपचे नेते देश सोडून पळून जातील, असे वक्तव्य राऊत यांनी केले होते. यावरून शहाजीबापूंनी राऊतांवर टीका केली आहे. संजय राऊत हा संध्याकाळी दिव्य स्वप्ने पाहणारा माणूस संजय राऊत हा संध्याकाळी वेगवेगळी दिव्य स्वप्ने पाहणारा माणूस आहे. जे स्वप्न संध्याकाळी पाहतात ते सकाळी टीव्ही समोर सांगण्याची त्यांची सवय असल्याचे शहाजीबापू पाटील यांनी म्हटले आहे. अजित पवार यांनी शरदचंद्र पवार गटाचे पाच खासदार फोडले तरच त्यांना केंद्रात मंत्रीपद मिळेल, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. यावरून शहाजीबापू यांनी संजय राऊत यांना सुनावले आहे. अजित पवार यांना भाजपने कोणतीही अट घातली नाही, हे मी खात्रीने सांगू शकतो, असा दावा देखील त्यांनी केला आहे. त्यामुळे ईव्हीएम मशीनवरील आक्षेप विधानसभेला विरोधकांचा दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे त्यांना घराच्या बाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे. मात्र घराच्या बाहेर पडण्यासाठी आणि राजकारण पुन्हा कसे पुढे जायचे, यासाठी त्यांनी शोधलेला मार्ग म्हणजे ईव्हीएम मशीनवरील आक्षेप असल्याचे शहाजीबापू पाटील यांनी म्हटले आहे. मात्र जनतेने विरोधकांना नाकारले असल्याचा दावा देखील शहाजी बापू पाटील यांनी केला आहे. शहाजीबापू पाटील यांना मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा आगामी मंत्री मंडळामध्ये शहाजीबापू पाटील यांचा समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर देखील शहाजीबापू पाटील यांनी सुचक विधान केले आहे. पक्ष वाढीसाठी एकनाथ शिंदे आपल्यावर पक्ष पातळीवर किंवा शासकीय पातळीवरची मोठी जबाबदारी देतील. ती चांगल्या पद्धतीने पार पाडणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या संधीचा मी सोन करेल, असे देखील ते म्हणाले. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शहाजीबापू पाटील यांना मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केले आहे.

  

Share