एकनाथ शिंदे म्हणजे कर्णा सारखे दानशूर:शरद पवार गटाच्या आमदाराचे शिंदेंचे तोंडभरून कौतुक, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण एकनाथ शिंदे म्हणजे कर्णा सारखे दानशूर:शरद पवार गटाच्या आमदाराचे शिंदेंचे तोंडभरून कौतुक, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

एकनाथ शिंदे म्हणजे कर्णा सारखे दानशूर:शरद पवार गटाच्या आमदाराचे शिंदेंचे तोंडभरून कौतुक, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीरपणे स्तुती केली आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. जानकर यांच्या आमदारकीला जात प्रमाणपत्राच्या वादामुळे आव्हान असताना, त्यांनी होलार समाजाच्या मेळाव्यात शिंदे सेनेच्या मंत्र्यांसमोरच शिंदेंचे तोंडभरून कौतुक केले. यापूर्वीही ते पंढरपूरमध्ये शिंदे यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यांच्याकडून वारंवार होत असलेली ही स्तुती आता नव्या राजकीय समीकरणांचे संकेत देत आहे. उत्तम जानकर म्हणाले, मी 40 वर्षाच्या राजकारणात खूप माणसे पाहिली. पण एकनाथ शिंदे यांच्यासारखा माणूस वेगळा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे कर्णा सारखे दानशूर माणूस आहे, अशा शब्दात आमदार जानकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्तुती केली. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट व फलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले स्टेजवर उपस्थित होते. याच स्टेजवर त्यांचे कट्टर विरोधक असणारे भाजपचे माजी आमदार राम सातपुते असताना त्यांच्यासमोरच एकनाथ शिंदे यांची केलेली स्तुती वेगळा संदेश देत दिला गेल्याचे पाहायला मिळाले. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी एकमेकांवर टीका करणारे आमदार उत्तमराव जानकर, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि माजी आमदार राम सातपुते हे आज एकाच व्यासपीठावर एकत्र आले. होलार समाजाच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने हे तिन्ही नेते एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी या नेत्यांमधील शाब्दिक वादामुळे माळशिरसचे राजकीय वातावरण तापले होते. आता आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिकांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका कोणत्याही प्रकारचे राजकारण न आणता शांततेत पार पाडण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांना दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या आदेशांमुळेच हे तिन्ही नेते एकत्र आले असावेत अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. आगामी काळात हे तिघेही एकत्र येऊन स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करतील अशी शक्यताही वर्तवली जात आहे.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *