एकनाथ शिंदेंचा नाराजांना श्रद्धा सबुरीचा संदेश:म्हणाले – पदे येतात जातात, मंत्रिपद न मिळालेल्या आमदारांना पुढच्या टप्प्यात संधी देणार

विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. त्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी तसेच हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्र्यांचा देखील शपथविधी पार पडला. मात्र, महायुतीमधील घटकपक्षांमधील काही आमदारांना मंत्रिपद मिळाले नसल्याने नाराजीनाट्य देखील पाहायला मिळाले आहे. शिवसेना शिंदे गटातील अनेक आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, पदे येतात जातात. ज्यांना मंत्रिपद दिले त्यांच्यात क्षमता आहे आणि ज्यांना दिले नाही त्यांच्यात क्षमता नाही, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. आमच्याकडे संख्या जास्त आहे, काहीवेळा काही लोकांना श्रद्धा आणि सबुरी ठेवावी लागते, असे शिंदे म्हणाले. पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, जे आमदार आता पहिल्या टप्प्यात मंत्री बनले नाहीत, ते पक्षाचे आणि संघटनेचे काम करतील. त्यांना दुसऱ्या टप्प्यात संधी देऊन पहिल्या टप्प्यातील आमदारांना तेव्हा पक्षाचे काम करायला सांगू. हे रुटीन आहे आणि हीच कामाची पद्धत आहे, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्या टप्प्यात आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार असल्याचे सूचित केले आहे. दरम्यान, विजय शिवतारे आणि प्रकाश सुर्वे तसेच नरेंद्र भोंडकर यांनी देखील त्यांची नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. यावर एकनाथ शिंदे म्हणाले, विजय शिवतारे यांनी येऊन मला सांगितले की एकनाथ शिंदे यांचा विश्वासू सहकारी या पदाशिवाय मला दुसरे काही नको. हेच सर्वात मोठे पद आहे. प्रकाश सुर्वे हे देखील मला येऊन भेटले आहेत. नरेंद्र भोंडेकर यांनीही मला येऊन सांगितले आहे. पण हे लोक आता पुन्हा जोमाने काम करणार आहेत. आमची जबाबदारी आता वाढली आहे, असे शिंदे म्हणाले. पदे येतात आणि जातात, पदापेक्षा आपले उत्तरदायित्व आपले लोकांशी नाळ जोडली आहे त्यांच्याबरोबर आहे. मला काय मिळाले यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेला काय मिळणार हे महत्त्वाचे आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे.

  

Share