हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष स्थापन केल्यापासून केवळ आदेशावर चालणाऱ्या शिवसेना पक्षात आता लोकशाही रुजवण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे करत आहेत. शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी आता पारदर्शक मतदान प्रक्रिया राबवण्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये सात टप्प्यात डिजिटल आणि प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेने निवडणूक होणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे मुख्य नेता या पदासाठी एकनाथ शिंदे हे देखील निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्यामुळे त्यांना आता त्यांच्याच पक्षात आव्हान दिले जाते का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. शिवसेना पक्षामध्ये आता या महिन्याच्या शेवटी अंतर्गत निवडणुका होणार आहेत. शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. पदाधिकाऱ्यांची नियुक्ती ही निवडणुकीच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यामुळे सक्रिय कार्यकर्त्यांना या निवडणुकीत सहभागी होता येणार असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. शिवसेनेच्या अंतर्गत निवडणूक मतदानातून पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. तब्बल 22 वर्षानंतर शिवसेनेत अंतर्गत निवडणुका होत आहेत. विशेष म्हणजे मुख्य नेते या पदासाठी एकनाथ शिंदे यांना देखील निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात पक्षातच कोणी आव्हान देणार आहे का? याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. 2003 नंतर प्रथमच घटनेनुसार पक्षांतर्गत निवडणूक या निवडणूक प्रक्रियेमध्ये सात टप्प्यात ऑनलाईन आणि प्रत्यक्ष मतदानाद्वारे शिवसेना सदस्य हे पक्षाचे पदाधिकारी निवडणार आहेत. यामध्ये गटप्रमुख, शाखाप्रमुख, विभागप्रमुख, विभाग समन्वयक, जिल्हा संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, शिवसेना उपनेता, मुख्य नेता, लोकाधिकार समितीचे पदाधिकारी, महिला आघाडीचे पदाधिकारी देखील निवडले जाणार आहेत. शिवसेनेची पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया महिनाअखेर प्रत्येक जिल्ह्यात होत आहे. 2003 नंतर प्रथमच घटनेनुसार पक्षांतर्गत निवडणूक होत आहे.