ईव्हीएम म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मोहल्ला:सांगलीत भाजप आमदार नीतेश राणेंचे भाषण, हिंदुत्वाच्या मुद्यावर बोलताना केला हल्लाबोल
ईव्हीएम म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मोहल्ला असे म्हणत भाजप आमदार व मंत्री नीतेश राणे यांनी सांगलीमध्ये भाषण केले. या भाषणात त्यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भर दिला आहे. भाजपमधील हिंदुत्ववादी चेहरा म्हणून आता नीतेश राणे यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यांच्या आक्रमक भाषणामुळे समाजात तेढ निर्माण होईल असे भाषण त्यांनी करू नये, असा सल्ला देखील विरोधकांनी त्यांना दिला होता. मात्र सांगली येथे बोलताना त्यांनी पुन्हा एकदा विशिष्ट समाजाला लक्ष्य करत भाषण केले आहे. राज्यात महायुतीचे स्पष्ट बहुमताने सरकार स्थापन झाले. मात्र विरोधकांकडून ईव्हीएम मशीनवर टीका केली जात आहे. यावर भाषणात बोलताना नीतेश राणे म्हणाले, विरोधक ईव्हीएमच्या नावाने बोंबलतात, ईव्हीएम ला दोष देतात. पण विधानसभेला आम्ही तिकडे ईव्हीएमवरच निवडून आलोय. ईव्हीएम म्हणजे एव्हरी व्होट्स अगेन्स्ट मोहल्ला, असा फुलफॉर्मच नीतेश राणे यांनी सांगितला आहे. असे म्हणत त्यांनी एका विशिष्ट समाजाला लक्ष्य केले आहे. पुढे बोलताना नीतेश राणे म्हणाले, ज्याने भगवाधारी सरकार आणले त्यांचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे. महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार आहे. आम्हाला विशाळगडावर 12 तारखेला कसा उरूस होतो हे बघायचे आहे. असे म्हणत राणे यांनी यावेळी 12 जानेवारी उरूस निघू देणार नसल्याचे भाषणातून स्पष्ट केले आहे. सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्यावर टीका करताना नीतेश राणे म्हणाले, सांगलीत दोन कत्तलखाने सुरू आहेत, ते कसे सुरू आहेत हे खासदार विशाल पाटील यांनी सांगणे गरजेचे होते. परंतु मी फाटक्या तोंडाचा आहे हे त्यांना माहिती होते. म्हणूनच, माझ्या भाषणापूर्वीच ते येथील कार्यक्रमातून निघून गेले, असा टोमणा राणेंनी पाटलांना लगावला आहे. जो नियम हिंदूंना लागू होतो तो इतर धर्माला देखील लागू झाला पाहिजे. आता सरकार हिंदुत्ववादी आहे, आता कोणाचे लाड चालणार नाहीत, असेही नीतेश राणे म्हणाले. दरम्यान, 12 जानेवारी रोजी विशाळगडावर उरूस निघत असतो. यावर बोलताना नीतेश राणे म्हणाले, 12 तारखेला विशाळगडावर उरूस काढण्याचे नियोजन आहे. तिथे काही महिन्यांपूर्वी काय घडले आहे हे सर्वांना माहीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. हिंदू समाजाच्या एकंदरीत इच्छेनुसार 12 तारखेला कोणीही विशाळगडावर कायदा व सुव्यवस्था खराब करण्याचे काम करू नये, असे आवाहन नीतेश राणे यांनी केले आहे. पुढे नीतेश राणे म्हणाले, हिंदू समाजाने संयमाने घेतले असताना इतर समाजानेही संयमाने घ्यावे, उगाच कोणालाही चिथावण्याचे काम करू नये. उरूस काढून कोणालाही चिथावण्याचा प्रकार करू नये. शासन म्हणून आम्ही या घटनांवर लक्ष ठेऊन असणार आहोत, असेही नीतेश राणे यांनी स्पष्ट केले आहे.